ताज्या बातम्या

‘एक सुनेहरी शाम’ संगीत मैफिलीत पद्मश्री अनुप जलोटा, दिलीप सेन आणि के. रवि दादा यांची उपस्थिती; के. रवि दादांचा विशेष पुरस्काराने गौरव

मुंबई : मुंबईतील अंधेरी येथील प्रतिष्ठित मेयर हॉलमध्ये संध्या विकास सरदाना म्युझिक इव्हेंट्सतर्फे आयोजित ‘एक सुनेहरी शाम – मुंबई में सितारों के नाम’ हा संगीतमय कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला भजनसम्राट पद्मश्री अनुप जलोटा, प्रख्यात संगीतकार दिलीप सेन आणि के. रवि दादा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात पद्मश्री अनुप जलोटा यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी अनेक उदयोन्मुख गायक-गायिकांनी आपल्या सुरेल सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. सहभागी सर्व कलाकारांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजक विकास सरदाना आणि संध्या सरदाना यांनी आपल्या गुरू पद्मश्री अनुप जलोटा यांच्या मार्गदर्शनातून हा उपक्रम साकार झाल्याचे सांगितले. अनुप जलोटा यांनी आयोजकांचे कौतुक करत, अशा व्यासपीठातून भविष्यातील कलाकार घडतात, असे मत व्यक्त केले.

यावेळी संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल के. रवि दादा यांचा विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सन्मान स्वीकारल्यानंतर त्यांनी विकास सरदाना यांच्या नवोदित कलाकारांसाठीच्या कार्याचे विशेष कौतुक केले.

कार्यक्रमाला केसीएफ फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. कृष्ण चौहान यांच्यासह अनेक मान्यवर आणि संगीतप्रेमी उपस्थित होते. अनुप जलोटा, दिलीप सेन तसेच संध्या आणि विकास सरदाना यांच्या सादरीकरणाने संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध केले. या संस्मरणीय संगीत संध्याकाळी उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आयोजकांचे अभिनंदन केले.

Scroll to Top