ताज्या बातम्या

इतिहास वस्तुनिष्ठपणे समजून घेण्याची प्रेरणा देणारे ‘History Will Be Kinder’ : विकास साठे…. जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

नवी मुंबई : केतकी प्रकाशन आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक संघ, नेरूळ चे अध्यक्ष विकास बाबुराव साठे यांनी लेखक प्रथमेश मलईकर लिखित “History Will Be Kinder” या पुस्तकाविषयी मनोगत व्यक्त करताना, हे पुस्तक केवळ भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे चरित्र नसून त्यांच्या कार्याचे वस्तुनिष्ठ आणि संशोधनाधिष्ठित पुनर्मूल्यांकन असल्याचे सांगितले.
साठे म्हणाले की, डॉ. मनमोहन सिंग यांचा पंजाबमधील गाह या छोट्याशा गावातून सुरू झालेला प्रवास केंब्रिज, ऑक्सफर्ड, भारताचे अर्थमंत्री आणि पुढे पंतप्रधान पदापर्यंत कसा पोहोचला, याचे प्रभावी आणि अभ्यासपूर्ण चित्रण या पुस्तकात करण्यात आले आहे. १९९१ च्या आर्थिक सुधारणांपासून भारत-अमेरिका अणूकरारापर्यंतच्या महत्त्वपूर्ण निर्णयांचा, संस्थां वरील विश्वास, वैयक्तिक प्रामाणिकता तसेच शांत आणि संयमी नेतृत्वाचा संतुलित वेध लेखकाने घेतला असल्याचे त्यांनी नमूद केले.
हे पुस्तक कोणाचे अंध समर्थन करत नाही किंवा टीकेकडेही दुर्लक्ष करत नाही. उलट, वाचकाला पूर्वग्रह बाजूला ठेवून इतिहासाकडे वस्तुनिष्ठ नजरेने पाहण्याची प्रेरणा देते. लोकप्रियता क्षणभंगुर असली तरी दूरदृष्टीचे निर्णय इतिहास घडवतात, हा संदेश या पुस्तकातून प्रभावीपणे अधोरेखित होतो, असेही त्यांनी सांगितले.
पुस्तकाची संशोधननिष्ठ मांडणी, संयत भाषा आणि संतुलित दृष्टिकोन ही त्याची खरी ताकद असल्याचे सांगत, हे पुस्तक विद्यार्थी, संशोधक, प्रशासकीय अधिकारी तसेच नेतृत्वाचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी साठे यांनी केतकी प्रकाशनचे श्री चंद्रकांत जाधव यांनी सामाजिक कार्याची दखल घेत जीवन गौरव पुरस्कार प्रदान केल्याबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. हा पुरस्कार आपण आपल्या आई-वडिलांना समर्पित करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या संस्कारांमुळेच समाजसेवेची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच हा सन्मान ज्येष्ठ नागरिक संघ, नेरूळ च्या सर्व पदाधिकारी व सभासदांचाही असल्याचे सांगून, या पुरस्कारामुळे समाजासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा आणि बळ मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी केतकी प्रकाशन, लेखक प्रथमेश मलईकर आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.

Scroll to Top