कुडाळ(अजित जगताप) : जावळी तालुक्यातील विकासात्मक दृष्टिकोनातील दोन नंबरचे कुडाळ गाव आहे. या गावातील राजकीय कलगीतुऱ्याने ग्रामपंचायत रजिस्टर ला नोंद नसलेल्या रस्त्यावर कॉंक्रिटीकरण केले आहे. याबाबत तक्रार करणाऱ्या दोन्ही बाजूची डाळ शिजत नसल्याने अखेर कुडाळ नगरीत प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी एका गटाला पत्रकार परिषदेमधून न्यायाची मागणी केली आहे.
त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, कुडाळ ग्रामपंचायतच्या शासकीय अभिलेख व माहिती अधिकारातून प्राप्त कागदपत्रांवरून कुडाळ येथील व्यायाम शाळेत शेजारील रस्त्याबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.४६ हजार ९०० रुपयांचा सार्वजनिक निधी या रस्त्यासाठी खर्च करण्यात आला आहे. परंतु ग्रामपंचायत रजिस्टर पुस्तकात त्याची कोणत्याही प्रकारे नोंद नसलेला रस्ता,जागेच्या मालकीबाबतची तफावत,करारनाम्यातील संशयास्पद बाबी,मोजमाप पुस्तिका तसेच सादर केलेले देयक प्रक्रियेबाबत प्रश्न निर्माण करण्यात आलेले आहेत. याबाबत निष्पक्ष चौकशी करावी,अशी मागणी कुडाळ ग्रामस्थ दत्तात्रय शिंदे व ग्रामस्थांनी केली आहे.
या प्रकरणी जावळी पंचायत समितीचे ग्रामपंचायत विभागातील विस्ताराधिकारी यांनी कुडाळ येथे प्रत्यक्ष स्थळ पाहणी व मोजमाप करून चौकशी केली.मात्र अद्याप अंतिम चौकशी अहवाल तयार झालेला नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात आहे. कुडाळ
ग्रामपंचायतीकडून मिळालेल्या लेखी माहितीनुसार सदर रस्त्याची ग्रामपंचायत दप्तरी नोंद नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.त्यामुळे ग्रामपंचायत निधीतून या रस्त्याचे काँक्रीटीकरण करताना रस्त्याची अधिकृत नोंद आणि जागेचा मालकी हक्क कोणत्या आधारावर निश्चित करण्यात आला?,असा सवाल प्रतापराव शिंदे यांनी केला आहे.२९ जुलै रोजी झालेल्या स्थळ पाहणीदरम्यान सदर काँक्रीटीकरणाची जागा तसेच ग्रामपंचायत मालकीची सिटी सर्व्हे नंबर ७९३ असलेल्या जागेची पाहणी व मोजमाप करण्यात आले.या पाहणी दरम्यान दोन्ही जागांमध्ये तफावत असल्याचे निदर्शनास आल्याचा दावा अमृतराव शिंदे यांनी केला आहे.
विशेष म्हणजे तत्कालीन कुडाळ ग्रामपंचायत अधिकारी रजनीकांत गायकवाड यांनी सदर जागा ग्रामपंचायत मालकीची असल्याचे दप्तरी नमूद आहे असे सांगितले.तर विद्यमान ग्रामपंचायत अधिकारी उमेश जाधव यांनीही अभिलेखात रस्त्याची नोंद नसल्याचे स्पष्ट केले आहे. दोन ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची मत भिन्नता हेच आता वादाचे मूळ कारण बनले आहे.
सदर कामासाठी कुडाळ गावचे ठेकेदार स्वप्निल चंद्रकांत गवळी यांची नियुक्ती झाल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट आहे.मात्र, उपलब्ध कागदपत्रांमध्ये कोऱ्या स्टॅम्पवर ठेकेदाराची सही जोडलेली आहे.
याबाबत अंतिम निष्कर्ष काढण्यात आलेला नसला तरी संबंधित स्टॅम्प पेपर,करारनामा,ठेकेदाराची सही,निविदा कागदपत्रे व इतर अभिलेखांची सक्षम यंत्रणेमार्फत सत्यता तपासावी,अशी मागणी केली आहे.सदर कामाची मोजमाप पुस्तिका उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले असून त्यावर तत्कालीन सरपंच सुरेखा निवृत्ती कुंभार व तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी रविकांत संपकाळ यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .
त्यामुळे मोजमापी पुस्तकेमध्ये नमूद केलेली रस्त्याची लांबी,रुंदी, काँक्रीटची जाडी,वापरलेले साहित्य व प्रत्यक्ष कामाचे प्रमाण यांची प्रत्यक्ष स्थळावरील कामाशी पडताळणी करावी.
तसेच कामाचे बिल अदा झाले असल्यास त्याची मूळ प्रत,बिल क्रमांक व दिनांक,बिलाची रक्कम, ठेकेदाराचा जी.एस.टी. तपशील,बँक खाते,व्हाउचर,देयक मंजुरी तसेच धनादेश व्यवहाराची माहिती तपासण्याची मागणी कुणाच्या काही ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, ग्रामपंचायत अधिकारी जाधव यांचा जबाब न मिळाल्यामुळे अहवाल पुढे सरकू शकत नाही.असे प्रशासनाकडून सांगण्यात आल्याचे नमूद केले आहे.
या प्रकरणी २७ जानेवारी २०२६ रोजी जावळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री पाटील यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली होती. याबाबत समाधानकारक माहिती मिळाली नसल्याची काही ग्रामस्थांची तक्रार आहे. दरम्यान, सदरच्या रस्त्याबाबत मालकी हक्काचा वाद अनेक दिवस सुरू आहे. आरोप प्रत्यारोपाच्या साईट पट्टीमुळे नेमका रस्ता किती व कुणाचा? याबाबत निर्णय घेणे कठीण बनले आहे. कुडाळ गावात तंटामुक्त अभियान समिती अस्तित्वात असेल तर त्यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून यातून मार्ग काढावा. अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे …………………………………. फोटो – कुडाळ ता. जावळी येथील रस्त्याबाबत मत व्यक्त करताना काही ग्रामस्थ…




