नवी मुंबई : मैत्री हे केवळ दोन व्यक्तींमधील नाते नसून आयुष्याच्या प्रवासात मनाला तृप्त करणारा निर्मळ झरा आहे, याची अनुभूती देणारा भावपूर्ण सोहळा कामोठे येथे पार पडला. लेखक डॉ. गोरखनाथ पोळ यांच्या ‘मैत्री एक मिनरल वॉटर’ या पाचव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विशेष म्हणजे डॉ. पोळ यांच्या ५१व्या वाढदिवसाचे औचित्यही साधल्याने कार्यक्रमाला साहित्य, मैत्री आणि आपुलकीची विशेष किनार लाभली.
या सोहळ्यास सुप्रसिद्ध वक्ते रवींद्र पाटील, केतकी प्रकाशनचे संचालक चंद्रकांत जाधव, एस. नॅपकिन बुके सत्कार हाऊसच्या संचालिका सविता गोरखनाथ पोळ, डॉ. मंदार पनेलकर, डॉ. अनंता धरणेकर, उद्योजक राकेश गुप्ता, एस.व्ही.एन. स्कूलचे चेअरमन रमेश संकपाळ, जीवनदीप प्रकाशनचे वरिष्ठ एक्झिक्युटिव्ह विकी अग्रवाल, विवेक खरारे, रकहुल राणे, अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक चाळके साहेब, लेखिका स्मिता पनेलकर, डीपीएम टेकचे संचालक दिलीप गुप्ता, हरिभक्तिपरायण कीर्तनकार शिंदे सर, OMG Book Record चे संस्थापक दिनेश गुप्ता यांच्यासह शिक्षण, साहित्य, उद्योग व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे निवेदक नारायण लांडगे पाटील यांनी आपल्या ओघवत्या शैलीत पुस्तकाचा आशय उलगडताना हे पुस्तक केवळ मैत्रीवर आधारित नसून डॉ. गोरखनाथ पोळ यांच्या जीवनप्रवासासोबतच एका मार्केटिंग एक्झिक्युटिव्हची ‘झिरो टू हिरो’ प्रेरणादायी यशोगाथा मांडणारे असल्याचे सांगितले. त्यांच्या या विवेचनामुळे उपस्थितांमध्ये पुस्तकाविषयी उत्सुकता निर्माण झाली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. मंदार पनेलकर यांनी प्रास्ताविकातून डॉ. पोळ यांच्या साहित्यिक, शैक्षणिक आणि सामाजिक वाटचालीचा परिचय करून दिला. त्यानंतर ‘कविता डॉट कॉम’च्या कवी-कवयित्रींनी मैत्रीच्या विविध भावछटा कवितांच्या माध्यमातून रसिकांसमोर सादर केल्या. प्रसिद्ध कवी अनंत राऊत यांच्या कवितेने काव्यमैफलीला सुरुवात झाली. त्यानंतर सादर झालेल्या मैत्रीवरील कवितांना रसिकांनी उत्स्फूर्त टाळ्यांनी दाद दिली. जणू शब्दांच्या आकाशात मैत्रीचे ढग दाटले आणि सभागृहात कवितांचा आनंददायी पाऊस बरसत राहिला.
यावेळी विविध मान्यवरांनी डॉ. गोरखनाथ पोळ यांना पुस्तक प्रकाशन तसेच ५१व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. मित्रपरिवाराने सांगितलेल्या आठवणी, शुभेच्छा आणि आपुलकीच्या शब्दांमुळे सोहळा अधिकच भावपूर्ण झाला.
प्रकाशक चंद्रकांत जाधव यांनी डॉ. पोळ यांच्या लेखनप्रवासाचे कौतुक करताना त्यांच्या पाचव्या पुस्तकासाठी शुभेच्छा दिल्या. अनुभवांना सहज आणि प्रभावी शब्दरूप देणे तसेच जीवनातील साध्या प्रसंगांतून व्यापक आशय शोधणे हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या समारंभाध्यक्ष सौ. लता पवार, संस्थापिका–गायत्री एज्युकेशन ट्रस्ट, यांच्या प्रमुख उपस्थितीत पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. पोळ यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांनी ते केवळ लेखक नसून शाळांचे हितचिंतक आणि शिक्षणक्षेत्रातील अनेक व्यक्तींचे जिवाभावाचे मित्र असल्याचे सांगितले. ‘मी GEN X… एका GEN Z चा बाबा’ या त्यांच्या पुस्तकाचाही संदर्भ देत ‘मैत्री एक मिनरल वॉटर’ हे पुस्तकही लोकप्रिय ठरेल, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
अभंग गायनातील विजेत्या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान
या साहित्यिक सोहळ्याला सामाजिक बांधिलकीची जोड देत ‘सखा पांडुरंग’ उपक्रमांतर्गत एस. नॅपकिन बुके सत्कार हाऊस पुरस्कृत आणि मानसी सामाजिक व शैक्षणिक संस्थेतर्फे आयोजित अभंग गायन उपक्रमातील पाच विजेत्या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. विजेत्यांना विठ्ठल-रुक्मिणीची आकर्षक मूर्ती देऊन गौरविण्यात आले.
मोरू नारायण म्हात्रे स्कूल, गव्हाण; बीसीटी स्कूल, उरण; डी.ए.व्ही. स्कूल, पनवेल; सुविद्या विद्यालय, कामोठे आणि वेस्टर्न हिल स्कूल, कामोठे या शाळांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी या उपक्रमात विजेते ठरले. यावेळी एका विद्यार्थिनीने संस्कृत काव्याच्या माध्यमातून डॉ. गोरखनाथ पोळ यांना पुस्तक प्रकाशन आणि वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
कामोठे आणि परिसरातील शिक्षणप्रेमी, साहित्यरसिक, मित्रपरिवार, विविध शाळांचे प्रतिनिधी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमात साहित्यिक गांभीर्य आणि मैत्रीपूर्ण उत्साह यांचा सुरेख संगम पाहायला मिळाला.
कार्यक्रमाच्या अखेरीस रमेश संकपाळ यांनी उपस्थित मान्यवर, मित्रपरिवार, विद्यार्थी, पालक, कविता डॉट कॉमची टीम आणि आयोजनात योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार मानले. ‘मैत्री एक मिनरल वॉटर’ हे पुस्तक निखळ मैत्रीचा आनंद देणारे आणि जीवनाकडे मैत्रीच्या सकारात्मक दृष्टीने पाहण्याची प्रेरणा देणारे असल्याचे त्यांनी सांगितले.
एकंदरीत, ‘मैत्री एक मिनरल वॉटर’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा हा केवळ पुस्तक प्रकाशनापुरता मर्यादित न राहता मैत्री, साहित्य, कविता, सन्मान आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर मिलाफ ठरला. पुस्तकाचे नाव ‘मैत्री एक मिनरल वॉटर’ असले, तरी या सोहळ्यात उपस्थित प्रत्येकाच्या मनाला मिळालेला मैत्रीचा घोट मात्र खऱ्या अर्थाने अनमोल ठरला.




