मुंबई : लावणी कलावंत महासंघाच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘लावणी गौरव सोहळ्या’त यंदा भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले ज्येष्ठ लावणी कलावंत रघुवीर खेडकर यांचा मुंबईकरांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
याच कार्यक्रमात मेघराज भय्या भोसले यांची अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही विशेष गौरव करण्यात येणार आहे.
हा भव्य सोहळा बुधवार, दि. १५ जुलै रोजी सायंकाळी ४.३० वाजता छत्रपती शिवाजी मंदिर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष लिंबोरे पाटील तसेच कार्यकारिणीच्या पुढाकारातून ‘मुंबईच्या लावणीचा प्रवास’ या संकल्पनेवर आधारित ‘लावणी जल्लोष’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार असून, मुंबईतील नामवंत लावणी कलाकार आपल्या बहारदार सादरीकरणातून रसिकांना लावणी कलेची समृद्ध परंपरा अनुभवायला देणार आहेत.
लावणी कलेचा गौरव, ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान आणि नव्या पिढीपर्यंत या लोककलेचा वारसा पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा सोहळा लावणी रसिकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.




