“नमस्कार !
या बरं झालं तुम्ही आलात. मी फक्त कळवलं. मला मेसेज पाठवता येत नाही. ते काम कल्पना आणि शेखर करताहेत. महेशही करतोय मदत. बरं, खाली चहाची व्यवस्था केली आहे. चहा प्यायलात कां? जा पहिल्यांदा चहा घेऊन या. ही खारी घ्या. गिरगावातली आहे. साखर पण आहे त्यात. हां, शुगर फ्री शुगर. ३ ते ४ चहापान. मग चार वाजता आपला कार्यक्रम सुरु. ए बाळा, तो पडदा बरोबर लाव. लाईट बरोबर लागला पाहिजे. बॅनर बरोबर आहे नां ? मुद्दामच लिहिलंय ‘अध्यक्ष’ नसलेलं माझं पत्रकार संमेलन. झंझट नको. सगळं मी करतोय. माझ्या मनाप्रमाणे. कुणाकडून पैसा घेऊन खिशात टाकणारा नाही. व्यवहार चोख. हां, श्रीरंग, बरं झालं बाबा वेळेवर आलास. कार्यक्रम वेळेवर सुरु झाला पाहिजे.” अशा पद्धतीने एकच पांढऱ्या शुभ्र कपड्यातली व्यक्ती हातात एक पिशवी नाचवत बोलत असते ती म्हणजे अशोक मुळ्ये काका ! अशोक मुळ्ये काका हे एक प्रथितयश रंगकर्मी म्हणून ओळखण्यात येतात. जशा नाट्यक्षेत्रात विविध रंगांच्या छटा आहेत तद्वतच पत्रकारिता, साहित्य, न्यायव्यवस्था, प्रशासन, राजकारण अशा सर्वच क्षेत्रात विविध रंगांच्या छटा आहेत. अशोक मुळ्ये काका यांनी ‘अध्यक्ष’ नसलेले पत्रकार संमेलन भरविले. त्यात पत्रकारितेतील साहित्य, राजकारण, नाट्य, चित्रपट, गुन्हेगारी अशा क्षेत्रांत वृत्तसंकलन करणारे, विश्लेषण करणारे तसेच संपादक असे विविधांगी व्यक्तिमत्त्वांना अशोक मुळ्ये काका यांनी पाचारण केले होते. “सूर्य, चंद्र, भरती, ओहोटी आणि विजय वैद्य कुणासाठी थांबत नाही,” असे ठणकावून सांगणारे तद्वतच विजयकुमार दत्तात्रय वैद्य, जव्हारच्या संस्थानिक काकी वैद्य यांचा चिरंजीव, अशी स्वतःची ओळख सांगणारे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, पत्रकार, समाजसेवक विजय वैद्य यांनी १४ सप्टेंबर २०२४ रोजी इहलोकीची यात्रा संपविली. स्वतःच्याच मस्तीत जगणारा हा अवलिया केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांचा निस्सीम भक्त जरी आज आपल्यात नसला तरी ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये उर्फ मुळ्ये काका यांच्या रुपाने एक जबरदस्त भन्नाट अवलिया आज आपल्याला पावलोपावली तेच प्रत्यंतर आणून देत आहे. मी उबाठाचा कट्टर कार्यकर्ता [एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर निवडणूक आयोगाने दिलेले नांव शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) म्हणजेच आता प्रचलित झालेले नांव उबाठा] परंतु भाजपवालेही माझ्यावर प्रेम करतात, असे आवर्जून मुळ्ये काका सांगतात. मी जाणीवपूर्वक विजय वैद्य आणि अशोक मुळ्ये काका यांच्यातील साधर्म्य नमूद करतोय. अर्थात हे माझे मत आहे. कुणाला ते पटो अथवा ना पटो. परंतु दोन्ही ८१ वर्षांच्या अफलातून व्यक्तिमत्वांची कार्यपद्धती मला सारखीच जाणवली आहे. विजय वैद्य हे विवाहित तर अशोक मुळ्ये काका हे अविवाहित. परंतु कामाचा झपाटा दोघांचा सारखाच, अतीशय विलक्षण. दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात ‘अध्यक्ष’ नसलेले ‘माझे’ एकमेव पत्रकार संमेलन अशोक मुळ्ये काका यांनी आयोजित केले. कुणीतरी म्हटले की एवढी ‘मिसाईल्स’ एकत्र आणण्याचे काम एकट्या मुळ्ये काका यांनी केले. सगळे बाण, सगळी शस्त्रे एकाच ‘भात्यात’ राहू शकतील असा एकमेव ‘भाता’ हा मुळ्ये काकांचाच असू शकतो. कारण तसे पहायला गेले तर दोन पत्रकार एका ठिकाणी एकत्र येऊ शकत नाहीत. एक पत्रकार दुसऱ्याबद्दल चांगले बोलतांना सहसा आढळत नाही. बरे, न्यायमूर्ती सुद्धा या सभागृहात एखाद्या विनयशील, आज्ञाधारक विद्यार्थ्याप्रमाणे आवर्जून उपस्थित राहतात, ते केवळ आणि केवळ अशोक मुळ्ये काका यांच्याच प्रेमामुळे. न्या. सत्यरंजन धर्माधिकारी हे या पत्रकार संमेलनाला आले आणि त्यांनी सुस्पष्टपणे सांगितले की, बाबांनी सांगितले आहे की अशोकच्या कार्यक्रमाला न चुकता हजर रहात जा. कारण त्याचे कार्य फार मोठे आहे, तो स्वच्छ चारित्र्याचा आहे, याचाच अर्थ तो एकही पैसा खात नाही. कार्यक्रमाला जेवढे लागतील तेवढेच पैसे जमवतो आणि कार्यक्रम करुन ज्याचे पैसे त्याला न चुकता चुकते करतो. शिडशिडीत बांध्याचे, पांढऱ्याशुभ्र कपड्यात, (विजार पांढरी त्यात शर्ट खोवलेला) प्रारंभापासूनच वावरणारे. हल्ली पांढरे शुभ्र कपडे घालणाऱ्यांची संख्या वाढली असली तरी पांढऱ्याशुभ्र विजारीवर पांढरा शर्ट तोही दोन्ही हातावर कोपऱ्यापासून दुमडलेला, डोळ्यांवर चष्मा आणि आवाजात जरब. जे काय बोलायचे ते ताड की फाड, कुणाची हयगय नाही, कुणाची पत्रास नाही. अभिजीत देसाई यांनी लोकप्रभेत म्हणूनच ‘पांढरा दहशतवादी’ या शीर्षकाखाली अशोक मुळ्ये काका यांच्यावर लेख लिहिला होता. त्याची आठवण अनेकांनी करुन दिली. न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या पासून तर पत्रकारितेतील असंख्य दिग्गजांनी प्रेमपूर्वक हजेरी लावून काकांचा सन्मान ठेवला. ज्या दिवशी कार्यक्रम त्या दिवशी सकाळी सुद्धा अनेकांना भ्रमणध्वनी वरुन येण्याचे आपल्या खास शैलीत आमंत्रण देतांना, मला संदेश पाठवता येत नाही. आपण एकटेच या, कुणाला बरोबर आणू नका. पंगत आहे. ठराविक पानेच सांगितली आहेत. जेवल्याशिवाय जायचे नाही, असे परखडपणे एका दमात काकांनी सांगून टाकले. नाही म्हणायला महेश म्हात्रे, कल्पना राणे आणि शेखर जोशी यांनी अशोक मुळ्ये काका यांची संदेशांची ती बाजू चांगल्याप्रकारे सांभाळली होती. त्यातच महेश म्हात्रे यांना त्याच दिवशी सकाळी आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर झाला होता. म्हणून, “चला, मला एक सत्कारार्थी मिळाला” आणि सांगितल्याप्रमाणे अशोक मुळ्ये काका यांनी न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या शुभहस्ते महेश म्हात्रे यांना सन्मानित केले. हल्लीच्या काळात लोकप्रिय ठरलेले वृत्तवाहिनीवरील निवेदक प्रसन्न जोशी यांनी तोंडभरून महेश म्हात्रे यांचे कौतुक केले. तसेच संजीव साबडे यांनी श्रीरंग भावे यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले तेवढाच काय तो अपवाद. बाकी रंगमंच हा निव्वळ अशोक मुळ्ये काका यांचाच. लेखन त्यांचे, वाचन /निवेदन/सूत्रसंचालन त्यांचे, नेपथ्य त्यांचे, सर्वकाही त्यांचेच. सगळा एकहाती कारभार. उपस्थित दिग्गज पत्रकारांची नांवे नमूद करायची तर अख्खा स्तंभ नावांचाच होईल म्हणून कुणाचेही नांव देण्याचा मोह टाळतोय. आजी माजी संपादकांची आणि विश्लेषकांची जणू काही मांदियाळीच होती. सर्वच क्षेत्रातील मान्यवर पत्रकार आवर्जून आले होते आणि काकांनी दरवाजे लावून घेतल्याने भोजनाशिवाय कुणी बाहेर पडू शकत नव्हता. श्रीखंड पुरीचा बेत होता आणि पापड, लोणचे , चटणी, रायत्यापासून सारे पदार्थ काका स्वतः वाढप्याच्या भूमिकेतून वाढत होते. ख्यातनाम वकील संजीव सावंत यांनी दिलेले मदतीचे पन्नास हजार रुपये जसेच्या तसे काकांनी रंगमंचावर बोलावून ॲड. संजीव सावंत यांच्या हाती सुपूर्द केले. प्रख्यात गायक श्रीरंग भावे, गायिका दंत शल्यचिकित्सक डॉ . शिल्पा मालंडकर, गायिका विद्या करलगीकर यांनी तबला पेटीच्या साथीने बाबूजी सुधीर फडके, जगदीश खेबुडकर, आशा भोसले, आदींच्या सुरेल गाण्यांच्या मैफिलीने वातावरणात रंगत आणली. या गायक गायिकांनीही अशोक मुळ्ये काका यांच्या आज्ञाधारक विद्यार्थ्याप्रमाणे ते सांगतील त्याप्रमाणे ऐकण्याचे काम केले. अशोक मुळ्ये काका यांचा प्रेमरुपी आसूड प्रत्येकजण लीलया झेलत होता. अशोक मुळ्ये काका यांनी आपल्या सत्तर वर्षांच्या नाट्य सेवेत असंख्य अनोखे प्रकार करुन दाखविले आणि सर्वांनी त्याचा यथेच्छ आस्वाद घेतला. जुन्या नव्या अभिनेत्री अभिनेते यांना रंगमंचावर सन्मानित केले. मराठी रंगमंचावर वावरणारा प्रत्येक अभिनेता, अभिनेत्री हा अशोक मुळ्ये काका यांच्या जवळचा होता आणि आजही आहे. नाट्य समीक्षक म्हणजे तर अशोक मुळ्ये काकांचा खास. या प्रेमापोटी अनेक जण पुणे, नाशिक आणि संपूर्ण महाराष्ट्रातून हजेरी लावून गेले. एकखांबी तंबू म्हणजे काय ते अशोक मुळ्ये काका यांच्याकडे पाहून कळते. मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या सत्काराला विनम्रपणे नकार देणारा आणि मी सत्कार घेत नाही, आपण पक्षप्रमुख आहात म्हणून एक फूल घेतो. परंतु मी सत्कार स्वीकारत नाही, शाल श्रीफळही घेत नाही, हे माझे तत्व आहे. मी एक्क्याऐंशी वर्षांचा आहे, असे सुद्धा सुस्पष्टपणे अशोक मुळ्ये काका यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सांगितले. मुळ्ये काका हे खरोखरीच एक जगावेगळे रसायन आहे. झाले बहु होतील बहु परंतु अशोक मुळ्ये काका म्हणजे अशोक मुळ्ये काकाच. मला त्यांच्यात विजय वैद्य यांचीच छबी दिसते. दोघेही स्वतःच्याच मस्तीत जगणारे जबरदस्त भन्नाट अवलिया म्हणावे लागतील. अशोक मुळ्ये काकांना उदंड आयुष्य आणि ठणठणीत आरोग्य प्राप्त होवो तसेच त्यांच्या हातून ही अनोखी सेवा अविरत घडत राहो, आम्हाला त्यांचे मार्गदर्शन सतत मिळत राहो. जय महाराष्ट्र !
– योगेश वसंत त्रिवेदी, ९८९२९३५३२१. (लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत)