प्रतिनिधी ,: मराठी चित्रपटसृष्टीतील एक हळव्या आठवणींचा भाग बनलेले ज्येष्ठ अभिनेते, समीक्षक, दिग्दर्शक आणि प्राध्यापक माधव वझे यांचे आज सकाळी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते.
१९५३ मध्ये प्रदर्शित झालेल्या अजरामर ‘श्यामची आई’ या चित्रपटातून त्यांनी बालकलाकार ‘श्याम’च्या भूमिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्यांचे प्रचंड कौतुक झाले होते. त्यानंतर काही मोजक्या चित्रपटांत बालकलाकार म्हणून ते झळकले.
वय वाढल्यानंतरही त्यांनी अभिनयाची साथ सोडली नाही. बापजन्म, 3 इडियट्स, डिअर जिंदगी, एवढंस आभाळ अशा विविध मराठी आणि हिंदी चित्रपटांत त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या.
रंगभूमीवरही त्यांनी आपला ठसा उमटवला. हॅम्लेट या नाटकाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. शिक्षण क्षेत्रातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. पुण्याच्या वाडिया कॉलेजमध्ये ते प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.
साहित्यिक म्हणूनही त्यांची ओळख होती. प्रायोगिक रंगभूमी, रंगमुद्रा, श्यामची आई आचार्य अत्रे आणि मी, नंदनवन ही त्यांची उल्लेखनीय पुस्तके आहेत.
त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य, रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या जाण्याने अनेकांनी आठवणींना उजाळा देत आदरांजली अर्पण केली आहे.