मुंबई : बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्ध धर्मीयांसाठी श्रद्धेचा सर्वोच्च कळस समजला जातो.त्यामुळे याच्या मुक्तीसाठी सुरू असलेल्या संघर्षाला आता पेटते रूप मिळाले आहे. सामाजिक कार्यकर्ते सुरेश गायकवाड यांनी १२ मे, वैशाखी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी चैत्यभूमीवर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
या धक्कादायक इशाऱ्यामुळे मुंबई पोलिसांनी गायकवाड यांना नोटीस बजावून थेट कारवाईचा इशारा दिला आहे. शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली, तरी गायकवाडांनी माघार घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
गायकवाड गेली तीन दशके आंबेडकरी, सामाजिक आणि राजकीय आंदोलनात सक्रिय आहेत. त्यांनी स्वतंत्र विदर्भ, नदीजोड प्रकल्प, स्वतंत्र मतदार संघ अशा अनेक विषयांवर आवाज उठवला आहे. मात्र यावेळी ते अतिशय कठोर आणि निर्णायक भूमिकेत दिसत आहेत.
“महाबोधी महाविहाराची मुक्ति झालीच पाहिजे. गरज पडल्यास माझं जीवनही अर्पण करेन!” गायकवाड यांचा हा शब्दशः ज्वालाग्राही इशारा समाज मनाला अस्वस्थ करत आहे.
मुंबईतील चैत्यभूमी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतिस्थळाचे केंद्र, तिथे आत्मदहनाचा निर्धार म्हणजे चळवळीच्या इतिहासातील एक नवीन धगधगती पान तयार होण्याची शक्यता!
राज्यभरातील बौद्ध समाज, आंबेडकरी कार्यकर्ते आणि सामाजिक संस्थांची नजर आता १२ मेच्या आंदोलनावर खिळलेली आहे.
या आंदोलनाचा शेवट काय होणार? प्रशासन गायकवाडांना रोखणार की त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहणार? हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.