मुंबई(रमेश औताडे) : राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये, मनोरुग्णालये व कामगार रुग्णालयांतील चतुर्थश्रेणी कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्या घेऊन आझाद मैदानात एक दिवसाचे आंदोलन करत आहेत. सरकारने लवकरात लवकर गंभीर होत निर्णय घेतला नाही तर हे आंदोलन बेमुदत केले जाईल. असा इशारा आमदार सचिन अहिर यांनी आझाद मैदानात दिला. यावेळी आमदार मनोज जामसुतकर यांनीही या कामगाराच्या मागण्यांवर सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या वतीने राज्यातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करुनही शासन दखल घेत नसल्याने बुधवारी आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले आहे असे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण, सुरेश आहेरकर,मार्तंड राक्षे, बाबाराम कदम यांनी सांगितले.
राज्यातील सर्व रुग्णालयांतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी ५ ते ६ मे रोजी राज्यभर काळ्या फिती लावून निदर्शने केली. तरीदेखील शासनाने केलेले अक्षम्य दुर्लक्ष लक्षात घेता आजचे हे लक्षवेधी धरणे आंदोलन केले करण्यात आले असल्याची माहिती सरचिटणीस बाळाराम सावर्डेकर, करण सोनवणे यांनी यावेळी दिली.
सर्व रुग्णालये व विभागातील वर्ग-ड ची रिक्त पदे सरळसेवेने तात्काळ भरुन, सध्या सुरु असलेले खाजगीकरण/कंत्राटीकरण धोरण रद्द करावे, मनोरुग्णालयातील ६३४ सफाईगारांची निरसित केलेली पदे पुनर्जिवित करावीत असे भगवान शिंदे,रामभाऊ पांचाळ,योगिता सोनवणे यांनी सांगितले.