मुंबई : मुंबईत दररोज निर्माण होणाऱ्या वैयक्तिक स्वच्छतेशी संबंधित घातक कचऱ्याच्या सुरक्षित व्यवस्थापनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका विशेष ‘ घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्यांचे संकलन सेवा ’ सुरू करत आहे. ही सेवा १ मे २०२५ पासून प्रत्यक्षात सुरू होणार असून २२ एप्रिलपासून इच्छुक आस्थापनांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती उपआयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.
सॅनिटरी नॅपकिन्स, डायपर्स, टॅम्पॉन्स, कालबाह्य औषधे, दूषित बँडेजेस, वॅक्सिंग स्ट्रिप्स अशा घातक कचऱ्याची सध्या अनेकदा अन्य कचऱ्यात मिसळ करून विल्हेवाट लावली जाते. त्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. पालिकेच्या अंदाजानुसार, मुंबईत दररोज सुमारे ७०-८० टन असा सॅनिटरी कचरा निर्माण होतो.
ही सेवा आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी आणि उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या मार्गदर्शनात राबवली जाणार आहे.
नोंदणीसाठी गृहनिर्माण संस्था, निवासी संकुले, महिला वसतिगृहे, ब्यूटी पार्लर आणि शैक्षणिक संस्थांना अर्ज करता येईल. तसेच, व्हॉट्सॲपद्वारे पाठविण्यात आलेल्या QR कोड स्कॅन करूनही नोंदणी करता येईल.
या कचऱ्यासाठी पिवळ्या रंगाच्या पिशव्यांचा वापर करण्यात येणार असून, नोंदणीकृत आस्थापनांमध्ये जाऊन बीएमसीकडून जनजागृतीही केली जाईल, अशी माहिती उपआयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.