कराड : गोटेवाडी ता.कराड येथील माणकेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात परसबाग फुलवली आहे. त्यातून कोबी, वांगी, मिरची, मेथी, कोथिंबीर आदी भाजीपाला पिकत आहे. विद्यार्थ्यांनी राबवलेल्या अनोख्या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
गोटेवाडी येथे ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे श्री माणकेश्वर विद्यालय आहे. या विद्यालयात आठवी ते दहावीचे वर्ग आहे. विद्यालयाने डोंगरी भागातील विद्यार्थ्यांची पायपीट थांबून त्यांना गावातच शिक्षणाची सुविधा उपलब्ध केली आहे. विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्यापैकीच परसबागेचा उपक्रम आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या परिसरातच सुमारे दीड गुंठा क्षेत्रात परसबाग फुलवली आहे. यामध्ये वांगी, कोबी, मिरची, मेथी, कोथिंबीर आदी भाजीपाला पिकवला आहे. त्याला विद्यार्थी नियमितपणे पाणी घालतात. शेतीच्या कामाची माहिती मिळून शेतीची आवड निर्माण त्यातून मदत होते. पिकवलेला भाजीपाला विद्यालयाच्या प्रधानमंत्री पोषण शक्ती आहार योजनेच्या आहारात वापरला जातो. यासाठी विस्तार अधिकारी लाड मॅडम, केंद्रप्रमुख जगताप मॅडम मुख्याध्यापक आर. जी. सुतार, यु. पी. जाधव, एस. एस. कणसे, जहाँगीर नायकवडी, जगन्नाथ सोरटे,यांचे मार्गदर्शन मिळत होते.यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व प्राथमिक शाळेतील शिक्षक उपस्थित होते.