
मुंबई : अरबी समुद्रात होणारे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक गेल्या ८ वर्षांपासून सरकारने दुर्लक्षित ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारला जागे करण्यासाठी आम्ही आझाद मैदानात जागरण गोंधळ घालत तीव्र आंदोलन केले. तरीही सरकारला जाग आली नाही.त्यामुळे आता स्वाक्षरी मोहीम राबवत जनजागृती करत तीव्र बेमुदत आंदोलन करणार असा इशारा जय शिव संग्राम चे मुंबई अध्यक्ष शशिकांत शिरसेकर यांनी आझाद मैदानात दिला आहे.
अरबी समुद्रात श्रीछत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवस्मारक बांधण्यासाठी गेल्या ८ वर्षापूर्वी मोठया थाटा माटात घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरबी समुद्रात स्मारकाचे जलपूजन केले होते. आज ८ वर्ष होऊन गेली. आतापर्यंत कामाला सुरुवात झाली नाही. देशांमध्ये इतर करोडो रुपयांचे प्रकल्प तयार झाले. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय कोणीही घेत नाही असे सांगत सरचिटणीस मुख्य प्रवक्ते दिपक कदम म्हणाले, ९० हजार कोटींचे रस्ते होत आहेत. अटल सेतू झाला. मुंबईच्या जमिनीखालून रेल्वे धावण्यासाठी काम सुरू आहे.