सातारा(अजित जगताप) : छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ हा भव्य चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. समीक्षक, मराठी, हिंदी सिनेसृष्टीकडून आणि प्रेक्षकांकडूनही या चित्रपटाचे भरभरून कौतुक होत आहे. चित्रपटातील तगडी स्टारकास्ट, उत्कृष्ट दिग्दर्शन, दर्जेदार संवाद, अंगावर शहारा आणणारी गीते, अप्रतिम व्हिएफएक्स, उत्तम छायाचित्रण यातून या चित्रपटाची भव्यता दिसून येत आहे.
संदीप रघुनाथ मोहिते-पाटील प्रस्तुत, आणि उर्विता प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाची निर्मिती शेखर रघुनाथराव मोहिते-पाटील, धर्मेंद्र सुभाष बोरा, सौजन्य सूर्यकांत निकम आणि केतनराजे निलेशराव भोसले यांनी केली आहे. या चित्रपटात ठाकूर अनुप सिंग याने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारलीआहे .
महाराणी येसूबाईंची भूमिका अमृता खानविलकर साकारत आहे. किशोरी शहाणे राजमाता जिजाबाई भोसले यांच्या भूमिकेत आहेत तर धाराऊ माताची भूमिका भार्गवी चिरमुले यांनी साकारली आहे. याव्यतिरिक्त मल्हार मोहिते-पाटील, संजय खापरे, पल्लवी वैद्य, कमलेश सावंत, विनीत शर्मा, प्रदीप रावत, प्रदीप कब्रा, राज जुत्शी यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत.
‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ हा चित्रपट मराठीत प्रदर्शित झाला असून येत्या २९ नोव्हेंबर रोजी देशभरात हिंदीत प्रदर्शित होत आहे.
निर्माते संदीप रघुनाथ मोहिते-पाटील म्हणतात, “प्रेक्षकांना हा चित्रपट आवडतोय. त्यांच्याकडून मिळणाऱ्या प्रतिक्रिया अत्यंत आनंद देणाऱ्या आहेत. प्रेक्षक, समीक्षक, इंडस्ट्रीतील आमचा परिवाराकडून चित्रपटाचे कौतुक ऐकताना एक समाधान मिळत आहे. सगळ्यांच्याच मेहनतीचे हे फळ आहे. सगळ्यांचे प्रेम असेच आमच्यावर कायम राहू दे. लवकरच याचा दुसरा भागही येईल.”
चित्रपटाचे दिग्दर्शक तुषार विजयराव शेलार म्हणतात, “ प्रेक्षकांकडून मिळणारे हे प्रेम पाहून मन भारावले आहे. चित्रपटाबद्दलच्या प्रतिक्रिया खरंच सुखावह आहेत. ज्या उद्देशाने या चित्रपटाची निर्मिती केली होती, तो उद्देश सफल होतोय, याचे समाधान आहे.”