मुंबई : देशभर साजरा केल्या जाणाऱ्या बाल दिनाच्या निमित्ताने धारावीतील बालक आणि पालकांनी एक अनोख्या पद्धतीने बालदिन साजरा करत एक वेगळा संदेश यानिमित्ताने अधोरेखित केला. श्रमिक युवा ग्रुपच्या वतीने धारावीतील कामराज नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या या छोटेखानी कार्यक्रमात धारावीतील असुविधांकडे लक्ष वेधण्यात आले.
श्रमिक युवा ग्रुपच्या वतीने येथे आयोजित करण्यात आलेल्या बाल दिनाच्या कार्यक्रमाला स्थानिक विद्यार्थ्यांच्या हातून केक कापण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना गुलाबाची फुले आणि चॉकलेट देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी या मुलांनी आपल्या हाती विविध संदेश देणारे घेतले होते. खेळासाठी मैदान नसलेल्या,
परिसरात चांगल्या शाळा नसलेल्या,प्रदूषित वातावरणात श्वास घेणाऱ्या मुलांचा बालदिन असा संदेश या फलकांवर लिहिला होता. तसेच आमच्यासाठी चांगल्या शाळा का नाहीत? आम्हाला खेळासाठी मैदान का नाही? आमच्या भविष्याशी खेळ का?
आमच्या बालपणाचा आनंद हिरावून का घेता? मुले ही देवाघरची फुले, मग आमच्यावर अन्याय का करता? असे थेट प्रश्नही या फलकांवर विचारण्यात आले होते.
कोट-
“आमच्या सेवाभावी संस्थेच्या वतीने धारावीतील मुलांसाठी आजचा बालदिन साजरा करताना संमिश्र भावना होत्या. या मुलांसोबत बाल दिनाच्या आनंद साजरा करतानाच, त्यांना आपण मूलभूत सुविधा देऊ शकत नाही, याबाबत वैषम्यदेखील वाटते. या मुलांना चांगले खेळाचे मैदान, दर्जेदार शाळा, ग्रंथालय, प्रदूषण रहित परिसर यांसह इतर मूलभूत सुविधा मिळाव्यात, हा संदेश अधोरेखित करण्यासाठी या कार्यक्रमाचे आम्ही आयोजन केले होते.
- मीनाक्षी दरवेशी, पालक
