सातारा(अजित जगताप ) : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्ताधारी जमात व्हा असा संदेश दिला होता. आणि स्वबळावर खासदार आमदार निवडून दाखवले होते. त्यांच्या पश्चात सध्या रिपब्लिकन पक्षाची अवस्था ना सन्मान.. ना पर्याय… अशी झाल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये महायुती असो किंवा महाविकास आघाडी या दोन्ही प्रस्थापित पक्षांनी रिपब्लिकन पक्षाचा वापर करून सत्ता हस्तगत केली. आता त्याचा वाटा देणे टाळल्यामुळेच रिपब्लिकन मतदार प्रचंड नाराज असल्याचे चित्र समोर आले आहे.
अनुसूचित जाती मधील जातीय वर्गीकरण करण्याचा प्रयत्न महायुतीच्या सरकारने केला आहे त्यामुळे अनुसूचित जाती मधील घटक पक्षांमध्ये सुद्धा आता आघाडी व युतीबद्दल शंका येऊ लागलेली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते एडवोकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे गट राज गवई गट असे प्रमुख चार गट सोडले तर दोन डझन गट रिपब्लिकन पक्षांमध्ये आहेत. त्यांची ताकद फारशी महाराष्ट्रात नाही. परंतु उत्तर प्रदेश मध्ये बहुजन समाज पक्ष व खासदार चंद्रशेखर आजाद यांच्या भीम आर्मीने तरुण कार्यकर्त्यांना आकर्षित केले आहे. याची जाणीव आता रिपब्लिकन पक्षातील नेत्यांनी झालेली आहे.
३ ऑक्टोबर १९५७ मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाली. पक्षाचे पहिले अध्यक्ष म्हणून शेड्यूल कास्ट फेडरेशनचे अध्यक्ष पी. एन. राजभोज झाले. सचिव बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे होते. उपाध्यक्ष बाबू आवळे तर सदस्य म्हणून दादासाहेब गायकवाड, बी. सी. कांबळे यांनी काम केले.वर्षभरातच पक्षात दुरुस्त-नादुरुस्त असे गट पडले. दुरुस्त गटात बी. सी. कांबळे, दादासाहेब रूपवते, एन.एम. कांबळे, बाबू हरिदास आवळे तर नादुरुस्त गटात दादासाहेब गायकवाड एन. शिवराज, बी. पी. मौर्य यांनी काम करण्यास सुरुवात केली होती. आज हा इतिहास रिपब्लिकन पक्षाचा असला तरी सध्याच्या रिपब्लिकन पक्ष म्हणजे मार्ग न सापडल्याने गोंधळलेल्या प्रवाशासारखी झालेली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या अधिवेशनामध्ये भाजपचे नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल गौरव आणि संविधानाबद्दल पुन्हा एकदा री ओढण्यात आली. संविधानामध्ये सर्वांना समान अधिकार देण्याची तरतूद डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली परंतु आता संविधानाला मानणाऱ्या पक्ष सुद्धा रिपब्लिकन पक्षाला बाजूला करत आहे. यातच सर्व काही आलेले आहे. याची जाणीव आता रिपब्लिकन मतदारांना झाली असून महाराष्ट्रात महायुती व महाविकास आघाडीला चांगलाच फटका बसल्या तरच खऱ्या अर्थाने रिपब्लिकन पक्षाच्या अस्तित्वाची जाणीव निर्माण होणार आहे. दलित- आदिवासी -अल्पसंख्यांक व अस्पृश्य समाजावर अन्याय करणाऱ्या जातीसमूहाच्या युती आघाडी मधून उगम झाल्यामुळे अशी परिस्थिती झाली असल्याचे अभ्यासक सांगू लागलेले आहेत.
————-&&&————————————–
फोटो रिपब्लिकन पक्षाचा प्रतिनिधिक स्वरूपातील फोटो (छाया- निनाद जगताप, सातारा)
