प्रतिनिधी : दरवर्षी गौरी, गणपतीसाठी महाप्रसादाचे अनेक ठिकाणी आयोजन करण्यात येत; मात्र सहा वर्षांपूर्वी महाप्रसादाचे जेवण उरल्याने ते फेकून द्यावे लागले होते. त्यामुळे जीवाची तळमळ झाली होती. तेव्हापासून महाप्रसादाचा खर्च टाळून एका अवलियाने माणसात देव शोधून गरीब, गरजू लोकांना व रुग्णांना गरजेच्या वस्तू, अन्नधान्य व खाऊ वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याप्रमाणे दि. 31 ऑगस्ट रोजी परळ येथील टाटा कॅन्सर रुग्णालयात रस्त्यावर राहून उपचार घेत असलेल्या रुग्णांना सुका मेवा व बिस्किटाचे वाटप केले.
माणसात देव शोधणाऱ्या या अवलियाचे नाव राजू महाले आहे. महाले व त्यांचे कुटुंबीय म्हणजेच त्यांची पत्नी अर्चना, मुलगा शेखर व मुलगी प्रांजल याकामी त्यांना सर्वोत्परी सहकार्य करतात. राजू हे बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियामध्ये सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होते. सध्या ते बॉक्सिंगचे जनरल ऍडमिनिस्ट्रेचे काम सांभाळत आहेत. ते दरवर्षी त्यांच्या घरी गौरी-पाणपतीची स्थापना करून महाप्रसादाचे आयोजन करत होते. मात्र, २०१९ मध्ये महाप्रसादाचे भरपूर जेवण उरले. ते फेकून देताना त्यांच्या जीवाची तळमळ झाली.
त्यामुळे त्यांनी महाप्रसादाचा खर्च टाळून त्यातून गरजू, अनाथ मुले, आश्रमात जाऊन त्यांना अन्नधान्य वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतलं. २०२०, २०२१ या दोन वर्षी कोरोना असतानाही राजू महाले व त्यांच्या कुटुंबीयांनी दुर्गम भागातील आदिवासी पाड्यात जाऊन गोरगरीब गरजूंना अन्नधान्य वाटप केले होते. उल्हासनगरातील महाराष्ट्र शासन महिला व बालविकास अंतर्गत श्रमिक महिला मंडळ हाताळत असलेल्या खुले निवारागृहातील लहान मुलांना अन्नधान्य वाटप करण्याचा कार्यक्रम उपक्रम राबवला होता.
टाटा कॅन्सर रुग्णालयात देशभरातून कर्करोगाचे रुग्ण उपचारासाठी येतात. यातील अनेक रुग्ण गरीब असतात. असे रुग्ण व त्यांचे कुटुंब रुग्णलयाच्या जवळ रस्त्यावरील पदपथावर राहून उपचार घेत असतात. अशा गरीब रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना पावसाळ्यात सुका मेवा व बिस्कीट वाटपाचा कार्यक्रम पार पडला. जवळपास 120 रुग्णांना खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी राजू महाले, संजय शिंदे, दिलीप गाडेकर, गिरिराज शेरखाने, प्रवीण सकट आदी उपस्थित होते.
भुकेल्याला अन्न, तहानलेल्या पाणी द्या. देव मूर्तीत नसतो, तो माणसात असतो, असे संत गाडगे महाराज यांनी सांगितले आहे. त्यानुसार दरवर्षी अन्नधान्य तसेच गरजेच्या वस्तूंचे वाटपाचा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे राजू महाले यांनी सांगितले.
