मुबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट किल्ल्यावरील भव्य पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळल्याच्या घटनेचे शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच या पुतळ्याचे उद्घाटन झाले होते पण भाजपा युती सरकारला भ्रष्टाचाराची इतकी कीड लागली आहे की त्यांना महाराजांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार केला. महाराजांचा पुतळा कोसळल्याने महाराष्ट्राच्या अस्मितेला भाजपा सरकारने कलंक लावला आहे. महाराजांचा पुतळा कोसळून जनतेच्या भावना दुखावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
यासंदर्भात बोलताना प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, भारतीय जनता पक्ष सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करत असते. यावेळी त्यांनी कहरच केला आहे. कमीशनखोरीसाठी किमान आपले आराध्य दैवत महाराजांना तरी सोडायला हवे होते पण भाजपाला त्याचे काही देणेघेणे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मुंबईत BKC येथे येत आहेत. यावेळी तीथेच महायुती सरकार भाजपा व पंतप्रधान मोदींचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात येईल असे प्रतिपादन गायकवाड यांनी केले आहे.