
तापोळा : सातारा जिल्ह्यात नवीन महाबळेश्वर गिरिस्थान विकास प्रकल्पाने गती घेतली आहे. नवीन महाबळेश्वर प्रकल्पाबाबत तापोळा येथे पार पडलेल्या बैठकीत १०५ गावातील ग्रामस्थांनी या प्रकल्पाचे स्वागत करून एकमुखी पाठिंबा दर्शविला आहे.
नवीन महाबळेश्वर प्रकल्पामुळे स्थानिक पर्यटनाला चालना मिळणार असून यामुळे अर्थव्यवस्था वृद्धिंगत होणार असल्याचे सांगण्यात आले.
नवीन महाबळेश्वर प्रकल्पाच्या नव्या अधिसूचनेप्रमाणे कोयना बॅकवॉटर व परिसरातील तब्बल २३५ गावांचा विकास साधून नवीन महाबळेश्वर वसविले जाणार आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील ३४, पाटण तालुक्यातील ९५, जावली तालुक्यातील ४६ आणि महाबळेश्वर तालुक्यातील ६० गावांचा समावेश आहे. जिल्ह्यातील नवीन ४० गावे समाविष्ट करण्याबाबत स्थानिकांकडून सूचना मांडण्यात आल्या.
यावेळी बोलताना एमएसआरडीसीचे संचालक जितेंद्र भोपळे म्हणाले, स्थानिकांना विचारात घेतल्याशिवाय प्रस्ताव अंतिम होणार नाही. जलाशयात बोटिंग तसेच गिरिस्थान परिसरात रोप वे तयार करू, स्थानिकांना केंद्रबिंदू मानून पर्यटनास प्रोत्साहन दिले जाईल तसेच स्थानिकांनी सूचना सुचवाव्यात, नवीन रस्त्यांचे जाळे विणले जाईल, नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. सुधारित शैक्षणिक सुविधा, व्यवसायाच्या संधी, शेतीपूरक उद्योग करून स्थानिकांची अर्थव्यवस्था वृध्दिंगत करू, इकॉलॉजिकल बॅलन्स हलणार नाही याची काळजी घेतली जाईल तसेच भूस्खलन होणार नाही. पर्यावरणीय संवेदनशील परिसराला कोणताही धोका निर्माण होणार नाही तसेच वनहद्दीतून रस्ते काढले जाणार नाहीत. वन्यजीवांच्या अधिवासाला धोका निर्माण होईल असे कृत्य होणार नाही. वन पर्यावरण मंत्रालयासहित सर्व प्राधिकरणांना विचारात घेतले जाईल. याबाबतचा
प्रारूप नकाशा तयार झाल्यानंतर तो नागरिकांना पाहण्यासाठी आमच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल दरम्यान यावर सूचना हरकती द्याव्यात असे देखील भोपळे यांनी सांगितले.
१०५ गावातील नागरिकांनी प्रकल्पाबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. कोयना पुनर्वसित गावठाणातील नागरी सुविधा मिळाव्यात असेही सांगण्यात आले. पर्यटकांना आकर्षित करून पर्यटन कसे वाढेल, यासाठी सर्वांनी आग्रही राहिले पाहिजे. हा परिसर निसर्गसंपन्न आहे. चांगल्या प्रकारची पर्यटन केंद्रे निर्माण करावीत, कौशल्य विकास केंद्रे तयार करू, नवीन पर्यटन स्थळे तयार करू, स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होईल, स्थानिकांच्या सूचना विचारात घेऊन पुढे जाता येईल असे एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी संचालक, नगर रचना,एमएसआरडीसी जितेंद्र भोपळे, नगररचना उपसंचालक प्रभाकर नाळे, सहाय्यक संचालक प्रीती जाधव, तहसीलदार अमर रसाळ, नगर रचनाकार प्रशील पाझरे, रवींद्र पगार, श्रीकृष्ण साठे तसेच १०५ गावातील संजय सपकाळ, विशाल सपकाळ, आनंद धनावडे, गणेश उतेकर, मिलिंद शिंदे, संजय मोरे, के. के. शेलार, नीलेश भोसले, संतोष जाधव, विठ्ठल धनावडे, तुकाराम धनावडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.