प्रतिनिधी : “उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधील वाद मिटला नाही, तर पुढचा मुख्यमंत्री मीच असेन”, असं वक्तव्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यावर प्रतिक्रिया देताना रामदास आठवले यांनी भाष्य केलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुंबईतील रंगशारदामध्ये शिवसैनिकांचा मेळावा घेतला. या मेळाव्यातून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “एकतर तू राहशील नाहीतर मी राहिन”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष केलं. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर भाजपचे दिग्गज नेते शिवसेनेवर तुटून पडले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप नेते सुधीर मुनटीगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं. तर भाजपकडून व्हिडिओ पोस्ट करत उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यात आलं. या व्हिडिओला भाजपने “उद्धव ठाकरे फक्त एवढं लक्षात ठेवा…”, असं कॅप्शन दिलं होतं. या व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, माझा एक सिद्धांत पक्का आहे. मी कोणाच्या नादी लागत नाही. कोणी नादी लागलं तर सोडत नाही.
अनेक जण म्हणाले, उद्धवजी तुम्ही देशाला दिशा दाखवली. मी म्हणालो आपण जोपर्यंत सरळ होतो. तेव्हा सरळ एकदा वाकड्यात घुसलो तेव्हा आपण वाकड करतो. भाजप म्हणजे चोर कंपनी आहे. राजकारणतली षंड माणसं आहेत. आपण असा लढलो की मोदींना सुद्धा घाम फुटला. मोदीचं भाषण ऐकताना कीव येतीये. मी नगरसेवक कधी झालो नाही थेट मुख्यमंत्री झालो, जे शक्य होतं ते मी सगळं केलं. हे आपल्यासाठी शेवटचं आव्हान आहे. त्यानंतर आपल्याला आव्हान देणार कोणी राहणार नाही. यांनी पक्ष कुटुंब सगळं फोडलं. आता हे आपल्याला आव्हान द्यायला उभे आहेत, असंही ठाकरे म्हणाले.
भाजप धमक्यांना भीक घालत नाही, प्रवीण दरेकरांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
प्रवीण दरेकर म्हणाले, फडणवीसांना व्यक्तिगत धमकी उद्धव ठाकरेंनी दिली आहे. भाजप धमक्यांना भीक घालत नाही. बाळासाहेबांचा वारसा सोडल्याचं यातून दिसून आलं. महाराष्ट्राच्या परंपरेला न शोभणारे वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं. मराठवाड्यात 20 हजार कोटींची गुंतवणूक झाली, त्यावरून जनतेचं लक्ष विचलीत करण्यासाठी केलेलं विधान आहे. अपप्रवृत्तीचे देवेंद्र फडणवीस कर्दनकाळ आहेत. फडणवीस सर्वात लोकप्रिय नेते हे वारंवार सिद्ध झाले आहे. ठाकरेंनी सर्व परंपरा गुंडाळून ठेवल्या आहेत.