तळमावले/वार्ताहर : पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने दिवाळी अंक स्पर्धा, स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार असे वाचन चळवळीला हातभार लावणारे उपक्रम राबवले जातात. यासाठी स्पर्धकांकडून तीन दिवाळी अंक आणि पुस्तकाच्या प्रती मागवल्या जातात. या तीनमधील एक प्रत सार्वजनिक ग्रंथालय, एक प्रत पुस्तकांचं झाड या उपक्रमास आणि उर्वरित शिल्लक राहिलेली प्रत नियोजित वाचनालयात ठेवण्यात येणार आहे. या माध्यमातून स्वतःच्या घरी सार्वजनिक वाचनालय सुरु करणार असल्याची माहिती डाॅ.संदीप डाकवे यांनी दिली आहे. ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजवण्यासाठी, वाचनसंस्कृतीला प्रेरणा आणि बळ देण्यासाठी डाकवे परिवाराने राबवलेला उपक्रम प्रेरणादायी आणि कौतुकास्पद असाच आहे. आपणही पुस्तके देवून या वाचन चळवळीत सहभागी होवू शकता.
या सार्वजनिक वाचनालयात असलेली पुस्तके मोफत वाचायला मिळणार आहेत. वाचकांनी स्वतःची नोंद करुन पुस्तके वाचण्यासाठी घरी घेवून जायचे आहे. वाचून झालेली पुस्तके परत वाचनालयात जमा करायाची आहेत. हे वाचनालय सर्वांसाठी खुले असणार आहे. समाजामध्ये वाचनसंस्कृती रुजावी, सुजाण सुसंस्कृत नागरीक घडावेत असा उदात्त हेतू ठेवून हे वाचनालय सुरु करण्यात येणार आहे. पुस्तकाच्या नोंदीसाठी रजिस्टर तसेच उपक्रमाबाबतच्या सुचनांसाठी अभिप्राय वही देखील ठेवली जाणार आहे.
यापूर्वी डाकवे परिवाराने वाचन चळवळ समृध्द करण्यासाठी मान्यवरांचे स्वागत पुस्तकाने, भित्ती चित्र काव्य स्पर्धा, प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशन, कु.सांचीच्या बोरन्हाण समारंभाला ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ चा संदेश देत महिलांना प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप, कॅलिग्राफीतून अक्षरसंस्कार इ.उपक्रम राबवले आहेत. याशिवाय स्पंदन एक्सप्रेस मासिकाच्या माध्यमातून लिहण्यासाठी वाचकांना एक व्यासपीठही निर्माण केले आहे.
चाफळ (ता.पाटण) येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील पवार यांनी त्यांच्याजवळ सुस्थितीत असलेली नामवंत लेखकांची 70 पुस्तके या वाचनालयाला देणार असल्याचे सांगितले आहे.
वाचन चळवळीसाठी अनोखे पाऊल उचलेल्या डाकवे परिवाराच्या या कृतीचे परिसरातून कौतुक होत आहे. या सार्वजनिक वाचनालयासाठी आपणही आपली पुस्तके देवू शकता. पुस्तके देणाऱ्या व्यक्तिंना सहभागाबद्दल स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तरी जास्तीत पुस्तकप्रेमीनी या अनोख्या ज्ञानयज्ञात सहभागी व्हावे असे आवाहन डाकवे परिवाराने केले असून अधिक माहितीसाठी 9764061633 या क्रमांकावर संपर्क साधावा.
