मुंबई प्रतिनिधी : ९० फिट रोड वरील मुख्य नाल्याला जोडणारा गोपीनाथ कॉलनी,शास्त्री नगर रोड वरील भूमिगत सांडपाणी वाहून नेणारा नाला २ आठवड्यापासून काहीतरी अडकल्यामुळे सांडपाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे धारावीतील लेझीम मैदान,शिव कृपा सोसायटी,सत्कार्य चाळ, एकता मित्र मंडळ,शास्त्री नगर शाळा परिसर,शंकर कवडे चाळ, सोनेरी मैदान,भारतीय चाळ, वीर लहुजी वस्ताद नगर,गोपीनाथ कॉलनी,मुकुंद नगर परिसरात गटराचे पाणी साठू लागले आहे. मागील दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून महापालिकेवर प्रशासक असल्याने तसेच नगर विकास विभाग खुद्द मुख्यमंत्र्यांकडे असूनही मुंबईतील धारावीत गटाराच्या पाण्यातून वाट काढत जावे लागत आहे. विभागातील महिला व शाळकरी विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासामुळे लाडकी बहीण गटाराच्या पाण्यात परंतु भावाला मात्र याची काळजी नाही असे उद्विग्न उदगार माजी नगरसेवक वसंत नकाशे यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून बोलून दाखवले आहेत.
विभागात गटाच्या पाण्यातून मार्ग काढून लोकांना जावे लागत असताना सर्वात पहिला राग हा नगरसेवक आणि महापालिकेवर निघत असतो. सध्या महापालिकेवर प्रशासक असल्यामुळे वसंत नकाशे यांनी पाठपुरावा करून शास्त्री नगर शाळा,गोपीनाथ चर्च सदर ठिकाणी सांडपाणी उपसा पंप २४ तास युद्धपातळीवर सुरू करण्या साठी प्रयत्न केले. तसेच जनतेने संयम ठेवावा,महापालिकेस सहकार्य करावे.
नागरिकांना होणाऱ्या गैरसोयी बद्धल दिलगिरी व्यक्त करीत लवकरच यातना जनतेची मुक्तता करण्यात येईल असे आश्वासन देखील दिले.