मुंबई : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या लेखनातून वास्तविक जिवनाचे दर्शन घडवले आहे. प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष कसा करायचा याची शिकवण त्यांनी दिली. राज्याच्या सामाजिक, राजकीय क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपले उभे आयुष्य मानवतेसाठी व शोषणमुक्तीसाठी समर्पित केले. अशा या महापुरुषाला देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारत रत्न देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करावा, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त चेंबूर येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे उद्यानातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रा. वर्षा गायकवाड यांनी अभिवादन केले. यानिमित्ताने अण्णा भाऊ साठे यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. खासदार प्रा. वर्षा गायकवाड यावेळी म्हणाल्या की, महाराष्ट्र ही साधू, संत, समाजसुधारक व महापुरुषांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांवर राज्याची वाटचाल सुरु आहे, याच भूमित लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जन्म झाला. अण्णा भाऊ साठे यांनी त्यांच्या लेखणीतून वास्तविकतेच दर्शन घडवले. आपल्या कथा, कांदबरीतून सामाजिक, राजकीय, परिस्थिती लोकांसमोर मांडताना मानवी नात्यांच्या गुंतगुंतीच्या वर्णनही त्यांनी केले आहे. अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा आणि चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे योगदान महत्त्वाचे आहे. महापुरुषांच्या जयंती, पुण्यातिथी या फक्त त्यांना पुष्पहार घालण्यापुरत्याच मर्यादीत न राहता त्यांनी घालून दिलेल्या आदर्शाचे पालन केले पाहिजे, त्यांच्या विचारातून प्रेरणा घेतली पाहिजे, असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रविंद्र पवार, माजी नगरसेविका आशाताई मराठे, कचरू यादव, जिल्हा अध्यक्ष फकिरा उकांडे, सरोजनी सकटे, देवेंद्र खलसे, सुदाम आवाडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.