तळमावले/वार्ताहर : विविध क्षेत्रातील सुमारे चौदा हजारपेक्षा जास्त व्यक्तिंना आपल्या कलेतून नावीण्यपूर्ण भेट देणारे पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी अभिनेते प्रशांत दामले आणि संकर्षण कऱ्हाडे यांना अनोखी भेट दिल्या. यावेळी अभिनेते विनय येडेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. दोन्हीही कलावंतांनी डाॅ.डाकवे यांच्या कल्पकतेचे कौतुक केले.
अभिनेते प्रशांत दामले यांना शनिवार दि.23 एप्रिल, 2022 रोजी कराड येथे ‘कसंतरी होतंय’ या नाटकाच्या सेटवर स्केच, मंगळवार दि.6 जून, 2023 रोजी अक्षरगणेशा तर शुक्रवार दि.5 जुलै, 2024 रोजी ‘गेला माधव कुणीकडे’ या नाटकाच्या वेळी शब्दचित्र दिले. विशेष म्हणजे प्रशांत दामले यांनी आतापर्यंत ज्या नाटकात भूमिका साकारल्या आहेत, त्या नाटकाच्या नावातून हे अनोखे शब्दचित्र साकारले होते.
अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांना सोमवार दि.2 जुलै, 2018 रोजी ‘देवा शप्पथ’ मालिकेच्या सेटवर अक्षरगणेशा, बुधवार दि.7 जून, 2023 रोजी स्केच तर शनिवार दि.6 जुलै, 2024 रोजी ‘नियम व अटी लागू’ या नाटकाच्या वेळी त्यांचे नाव आणि आडनाव यांच्या आद्याक्षरामधून साकारलेली कविता भेट दिली.
दरम्यान, डाॅ.संदीप डाकवे यांनी वडिलांच्या आठवणी जागवणारे ‘तात्या’ हे पुस्तक दोन्ही कलावंतांना दिले. तद्नंतर प्रशांत दामले यांनी डाॅ.डाकवे यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या तर “वर्षानुवर्षे अशीच भेट होत राहो, आपल्याही कलाकृतींना बहर येवो’’ अशा शब्दांत संकर्षण कऱ्हाडे यांनी शुभेेच्छा संदेश दिला.
डाॅ.संदीप डाकवे यांनी आपल्या कलेला समाजप्रबोधनाचे माध्यम बनवले आहे. यामुळेच त्यांना महाराष्ट्र राज्य शासनाकडून 6 वेळा तर विविध संस्थांनी सुमारे 70 हून अधिक पुरस्कार देवून गौरवले आहे.
कलेतून आत्मिक समाधान आणि जपलेेली सामाजिक बांधिलकी अतिशय कौतुकास्पद अशीच आहे. त्यांच्या या बांधिलकीचे समाजातून नेहमी कौतुक होत असते.
डाॅ.संदीप डाकवे यांनी कलावंतांना दिलेल्या अनोख्या भेटीची चर्चा उपस्थिंतामध्ये बराच काळ रंगली होती.

