मुंबई : धारावी काँग्रेस कमिटीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही धारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला. लोकनेते स्वर्गीय एकनाथ गायकवाड यांनी सुरू केलेली ही शैक्षणिक कौतुकाची परंपरा खासदार वर्षाताई गायकवाड यांनी पुढे सुरू ठेवली असून, त्यांच्या भगिनी आमदार डॉ. ज्योतीताई गायकवाड यादेखील हा वारसा जपत आहेत.
धारावीतील गोरगरीब कुटुंबांतील विद्यार्थ्यांनी उच्चशिक्षण घ्यावे, विविध क्षेत्रांत यश संपादन करावे, त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे आणि शैक्षणिक यशाबद्दल त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी, हा या सोहळ्यामागील मुख्य उद्देश आहे.
या सोहळ्यात दहावी, बारावी, पदवीधर, वैद्यकीय शिक्षण तसेच चार्टर्ड अकाउंटंट यांसारख्या विविध क्षेत्रांत यश मिळविणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी काँग्रेसचे आमदार अस्लम शेख, खासदार वर्षाताई गायकवाड, आमदार डॉ. ज्योतीताई गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.




