दहिवडी (अजित जगताप) : पूर्वी सर्व सामान्य माणसांना गोडधोड पदार्थ खाणे शक्य नव्हते. त्यामुळे सणासुदीला गोड पदार्थांचे आकर्षण होते. आता वर्षभर दिवाळी साजरी करणारे गर्भश्रीमंत आणि सत्ताधारी व दोन वेळचे जेवण सुद्धा न मिळणारे गरीब अशी दरी निर्माण झाली आहे. याची प्रचिती सातारा जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे. जाहीरनाम्यामध्ये नसलेले दिवाळीच्या तोंडावर राज्यकर्ते स्वतः दिवाळी साजरी करतात व फोटोसेशन साठी गरिबांना दिवाळी भेट देऊन त्यांची चेष्टा करत असल्याची चर्चा सुरू झालेली आहे. निवडणुकीच्या काळामध्ये कोट्यावधीची उलाढाल होते. अशावेळी मतदार असलेल्या गरिबांना त्यांच्या झोपडीत किंवा पालावर जाऊन वचननामा असो किंवा जाहीरनामा देऊन त्यांनी मत द्यावी. अशी विनंती करण्यासाठी कुठलाच बडा राजकीय नेता झोपडीत किंवा पालावर जात नाही. त्यासाठी काही स्थानिक जीवाभावाचे कार्यकर्तेच पक्षाने दिलेल्या ध्येय धोरणानुसार प्रचार करतात. विचारांना अपेक्षित बिदागी सुद्धा मिळत नाही. आता मात्र दुष्काळाच्या छायेखाली असणाऱ्या लोकांसाठी आम्ही खूप भले करतोय. हे दाखवण्यासाठी राज्यकर्ते व नेते मंडळींमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. सातारा जिल्ह्यातील काही नेते येऊ नकोस तर कुठल्या डब्यात बसू …अशा पद्धतीने बिन बुलाये मेहमान बनून सध्या शेतकरी- ऊसतोड कामगार यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्याचे चित्र उभे करत आहेत. हे चित्र प्रसार माध्यमातून दाखवण्यासाठी त्यापेक्षा जास्त पटीने खर्च होतो. ही गोष्ट ते कधीच कबूल करणार नाही. परंतु, आखो देखा हाल… अशा मंत्र्यांच्या शासकीय खर्चाच्या ताफ्यासोबत भेट देणाऱ्यांना चांगलेच गरिब लक्षात ठेवत आहेत. दिवाळीनिमित्त गोरगरीब व कष्टकरी आणि शेतमजूर- ऊसतोड कामगार आपल्या ऐपतीप्रमाणे दिवाळी साजरी करतात. यंदाच्या वर्षीच नव्हे तर कितीही संकट आले तरी ते कुणापुढे हात पसरत नाहीत. त्यांचा स्वाभिमानच त्यांची ताकद असते. खरोखर ज्या लोकांना दिवाळीनिमित्त भेट देण्याची गरज असते. त्यांना दिवाळी भेट देण्यामध्ये काही गैर नाही. उलट , माणुसकीच्या दर्शनाने खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करण्याचे भाग्य लाभते. पण, नुसती नाटकं करून दाखवणे. या गोष्टी आता समाज माध्यमावर चांगल्या चर्चा निर्माण करत आहेत. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीने चटणी भाकरी खाऊन काळी दिवाळी साजरी केली. त्याकडे लक्ष देण्यासाठी मंत्र्यांना वेळ नाही. शासकीय वाहनाचा ताफा त्यांच्यासमोरून जाताना किमान दोन मिनिटं त्या ठिकाणी थांबले. त्यांच्याशी संवाद साधला असता तर नक्कीच पांढरी दिवाळी साजरी झाली असती पण असे काही घडले नाही. वंचित बहुजन आघाडीचे नेते सिद्धार्थ कांबळे व अमोल गंगावणे यांनी हातात चटणी- भाकरी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रस्त्यावरच दिवाळीच्या दिवशी शेतकऱ्यांची अवस्था प्रतिनिधित्व स्वरूपात दाखवून दिली आहे. त्याकडे न पाहता प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींसोबत व्हिडिओ शूटिंग व फोटोसेशन करण्यामध्ये धन्यता मानणाऱ्या राज्याचे मंत्री व नेत्यांना ही दिवाळी सुखाची समृद्धीची व भरभराटीची जावो. असा शुभ संदेश शेतकरी कष्टकरी व ऊसतोड कामगारांनी दिला आहे. हीच खरी दिवाळी नेत्यांनी लक्षात ठेवावे. असा सूर उमटला आहे. दरम्यान, दिवाळीनिमित्त कोणताही गाजावाजा न करता गोरगरीब कष्टकऱ्यांना दिवाळीची भेट देणाऱ्या अनेकांनी खऱ्या अर्थाने माणुसकी जपली आहे. अशा स्वकष्टातून दानशूरपणा करणाऱ्या बिगर राजकीय नेत्यांना शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी सलाम केला आहे. त्यामध्ये शेतकरी संघटनेचे नेते बाळासाहेब चव्हाण, विजय पाटील, धनसिंग जाधव, प्रकाश सोन्या साबळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.




