ताज्या बातम्या

स्व. यशवंत पाध्ये यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्रातील संपादकांचा होणार गौरव

मुंबई : महाराष्ट्र संपादक परिषदेचे संस्थापक आणि ज्येष्ठ पत्रकार स्व. यशवंत पाध्ये यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्रातील संपादक आणि ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र संपादक परिषदेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल-श्रीफळ तसेच रोख रक्कम देऊन संपादकांचा गौरव करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र संपादक परिषदेच्या कार्यकारिणीची बैठक एकनाथ बिरवटकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील शिवाजी पार्क येथील होरायझन टॉवरमधील परिषदेचे उपाध्यक्ष सुधीर भाऊ जाधव यांच्या कार्यालयात संपन्न झाली. बैठकीत परिषदेच्या आगामी उपक्रमांसह विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

स्व. यशवंत पाध्ये यांनी महाराष्ट्रातील वृत्तपत्र संपादकांना एकत्रित व्यासपीठ मिळावे, त्यांच्या प्रश्नांना संघटितपणे वाचा फुटावी आणि संपादकांना समाजात योग्य मानसन्मान मिळावा, या उद्देशाने महाराष्ट्र संपादक परिषदेची स्थापना केली.

पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांनी प्रदीर्घ काळ योगदान देताना संपादकांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या प्रतिष्ठेसाठी सातत्याने भूमिका मांडली. विशेषतः स्थानिक व प्रादेशिक वृत्तपत्रांच्या संपादकांना भेडसावणाऱ्या अडचणी शासन आणि संबंधित यंत्रणांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी त्यांनी संघटनात्मक पातळीवर प्रयत्न केले.

संपादक हा केवळ वृत्तपत्राचा व्यवस्थापक नसून समाजातील प्रश्नांना वाचा फोडणारा, लोकमत घडविणारा आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची जबाबदारी पार पाडणारा घटक आहे, ही भूमिका स्व. यशवंत पाध्ये यांनी सातत्याने अधोरेखित केली.

महाराष्ट्रातील संपादकांना सन्मानाची वागणूक मिळावी, त्यांच्या कार्याची दखल घेतली जावी आणि पत्रकारितेतील योगदानाचा गौरव व्हावा, यासाठी त्यांनी केलेले कार्य महत्त्वपूर्ण मानले जाते.

त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या उद्देशाने त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त संपादक व ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संपादकांच्या योगदानाची दखल घेतली जाणार असून, नव्या पिढीतील पत्रकार आणि संपादकांनाही प्रेरणा मिळेल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.

बैठकीच्या प्रारंभी महाराष्ट्र संपादक परिषदेचे सचिव स्व. अनंत ऊर्फ राजू पाध्ये यांना उपस्थितांनी आदरांजली अर्पण केली.
बैठकीस परिषदेचे कार्याध्यक्ष प्रकाश कुलथे, उपाध्यक्ष सुधीर भाऊ जाधव, संस्थेचे उपाध्यक्ष गजानन चव्हाण, दीपाताई पाध्ये, हेमंत सामंत, राजेंद्र मोहिते, गोरख तावरे, डी. पी. विष्णुपुरीकर, अरुण सुरूडकर यांच्यासह कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

Scroll to Top