सायगाव(अजित जगताप) : सातारा जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील धोम धरणाचा ५८ ते १४७ किलोमीटर लांबीचा उजवा कालवा आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासकीय दुर्लक्षपणामुळे सायगाव तालुका जावळी भागात या कालव्याची अवस्था झाडझुडपातील पाऊलवाटेसारखी झाली आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जाण्याऐवजी कालव्यातच पाणी आडवा.. पाणी जिरवा.. झाड झुडपे वाढवा.. योजना राबवत आहे. अशी टीका होऊ लागलेली आहे.
सुमारे ५६ वर्षांपूर्वी धोम धरणातून फलटण पर्यंत जाणाऱ्या उजवा कालवा बांधण्यास सुरुवात झाली आहे. आता या कालव्याची प्रचंड दुरावस्था झालेली आहे. जणू काही झाड झुडपातून पाऊलवाट काढण्यात आली आहे. असेच चित्र दिसत आहे. याला जर विकास समजत असतील तर शेतकऱ्यांच्या दुर्दैव ठरणार आहे.
वाई, जावळी व सातारा तालुक्यांच्या ग्रामीण भागातून धोम प्रकल्प उजव्या कालव्याचे काम १९६८ ते १९७७ च्या दरम्यान झाले आहे. हा कालवा वाई, व्याजवाडी जावळी तालुका कुडाळ, सायगाव, सातारा तालुक्यातील लिंब आणि फलटण तालुक्यापर्यंत विविध गावांमधून भूभागाच्या नैसर्गिक उतारावरून मार्ग हा मुख्य कालवा आणि त्याचे विस्तीर्ण जाळे सुमारे ५८ किमी ते विस्तारित धोम-बलकवडी प्रकल्पांतर्गत मिळून १०,४६० हेक्टरहून अधिक क्षेत्राला वाई, जावळी, कोरेगाव, सातारा , फलटण परिसरातील शेतजमीन सिंचनाचे पाणी पुरवतो.
कुडाळ ते लिंब आणि आजूबाजूच्या परिसराचा सुमारे २,००० ते ३,५०० हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन या कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहे. यामध्ये प्रामुख्याने ऊस, आले , हळद आणि इतर भाजीपाल्याची पिके घेतली जातात. प्रभूची वाडी सायगाव परिसरात सध्या या उजव्या कालव्याची अवस्था प्रशासकीय दुर्लक्ष व दुरुस्ती अभावी अत्यंत दयनीय बनली आहे. धोम धरणाच्या उजव्या कालव्याची दुरवस्था झाल्यामुळे मे २०२६ मध्येच जावळी तालुक्यातील कुडाळ परिसरात धोम उजवा कालवा अचानक फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले होते. शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते .
कालव्याचे अस्तरीकरण अनेक ठिकाणी उखडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होत आहे . पाणी मुख्य पात्रातून वाहण्याऐवजी आजूबाजूच्या ओढ्या-नाल्यांमध्ये वाहून जाते . कालव्याच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. कालव्याच्या दुतर्फी कडेला काटेरी झाडीझुडपे वाढल्यामुळे पाण्याचा प्रवाह संथ होतो. परिणामी, शेवटच्या टोकाला असणाऱ्या शेतांपर्यंत पाणी पोहोचण्यात अडचणी येतात. पाटकरी आणि संबंधित पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्या योग्य नियोजनाअभावी एका बाजूला पाण्याची नासाडी होत असताना दुसऱ्या बाजूला ऐन गरजेच्या वेळी शेतकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या उजव्या कालव्याची तातडीने दुरुस्त करावी व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अशी मागणी सायगाव परिसरातील शेतकरी मनोज पवार, राजेंद्र कदम, अजित निकम, रवींद्र जगताप, अंकुश शिवणकर, सदाशिव बागल व इतरांनी केलंी आहे.
————————————-
फोटो– धोम धरणाच्या उजव्या कालव्याची सायगाव तालुका जावळी येथे झालेले अवस्था (छाया — अजित जगताप, सायगाव)




