ताज्या बातम्या

सुधारककार गोपाळ गणेश आगरकर पुरस्काराने होणार महाराष्ट्रातील मान्यवरांचा गौरव; तरुण भारत चे पत्रकार विजय जाधव हे पुरस्काराने होणार सन्मानित

कराड – सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या १७० व्या जयंती निमित्त इंद्रधनू विचार मंच फाऊंडेशनच्या आणि सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय, कराड यांच्या वतीने गोपाळ गणेश आगरकर सुधारक राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार २०२६ हा कार्यक्रम मंगळवार दि. १४ जुलै रोजी सकाळी ९ वा. सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय विद्यानगर , कराड येथे आयोजित केला आहे.

या कार्यक्रमात पत्रकारांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी पारधी मुक्ती आंदोलनाचे संस्थापक प्रकाश वायदंडे यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे, युवानेते उदयसिंह पाटील (उंडाळकर), सद् गुरू
गाडगे महाराज कॉलेजचे प्राचार्य चंद्रकात खिलारे, उद्योजक रामकृष्ण वेताळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद गोरे, संपादक शशिकांत पाटील, दैनिक तरूण भारत चे पत्रकार विजय जाधव, ज्ञान – माहिती संकलक प्रविण सरवदे, कोल्हापूरच्या पत्रकार दुर्वा दळवी यांना सुधारककार गोपाळ गणेश आगरकर राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

गोपाळ गणेश आगरकर यांची जन्मभूमी असलेल्या कराड येथे होत असलेल्या पत्रकारांच्या पुरस्कार सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन इंद्रधनु विचारमंच फाऊंडेशनचे विश्वस्त विकास भोसले, नितीन ढापरे, संदीप चेणगे, प्रमोद तोडकर, अशोक मोहने, माणिक डोंगरे यांनी केले आहे.

चौकट

थोर समाज सुधारक, संपादक, शिक्षण तज्ञ गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कराड तालुक्यातील टेंभू येथे दि.१४ जुलै १८५६ साली अत्यंत सामान्य कुटुंबात झाला. आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सामाज जागृतीच्या कार्यात आगरकरांचे अतुलनीय योगदान आहे. लोकमान्य टिळकांच्या केसरी वर्तमानपत्राचे संपादक म्हणून काम पाहिले. समाज सुधारणेबाबत आग्रही असणाऱ्या आगरकरांनी सुधारक वर्तमानपत्र सुरु केले. केसरी व मराठा या वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक समता, स्त्री-पुरुष समानता आणि विज्ञान निष्ठा अशी सुधारणावादी भूमिका त्यांनी सातत्यपूर्ण जपले. बुद्धि प्रामाण्यवादाचा पुरस्कार करणाऱ्या आगरकरीचे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या उभारणीत ही त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची होती. महाराष्ट्रातील समाजसुधारकांच्या मांदियाळीत सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.

Scroll to Top