कराड : कराड तालुक्यातील नांदलापूर येथील क्रीडा संकुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून संपूर्ण इमारत धुळखात पडल्याचे चित्र आहे. देखभाल व दुरुस्तीच्या अभावामुळे क्रीडा संकुलाचा वापर मर्यादित झाला असून स्थानिक खेळाडू आणि क्रीडाप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
क्रीडा संकुलातील इमारतीची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून अनेक ठिकाणी भेगा, तुटलेले भाग आणि अस्वच्छ परिसर दिसून येतो. नियमित देखभाल न झाल्यामुळे खेळाडूंना सरावासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील होतकरू खेळाडूंना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या क्रीडा संकुलाची अशी दुर्दशा होणे ही चिंतेची बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून इमारतीची दुरुस्ती, परिसराची स्वच्छता आणि आवश्यक क्रीडा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिक व खेळाडूंनी केली आहे.
क्रीडा संकुल पुन्हा कार्यक्षम झाल्यास तालुक्यातील अनेक खेळाडूंना सरावासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध होईल. त्यामुळे प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.




