प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदाराचाच धारावी पुनर्वसनाला विरोध असल्याचे बघायला मिळत आहे. धारावीतील हजारो प्रकल्पबाधितांना कुर्ल्याच्या ८ एकर जागेवर पुनर्वसन करण्यासंदर्भात निर्णय झाला आहे. पण राज्य सरकारच्या या निर्णयाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच पक्षाच्या आमदाराचा विरोध आहे. विशेष म्हणजे धारावी पुनर्वसनाच्या या निर्णयाविरोधात आमदार मंगेश कुडाळकर हे थेट आता आंदोलनात उतरणात आहेत. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचा आधीपासूनच या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे. आता मंगेश कुडाळकर यांनी विरोध केल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत काय निर्णय घेतात, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मंगेश कुडाळकर यांनी महाराष्ट्र राज्याच्या गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर-सिंह यांना पत्र पाठवत भूमिका मांडली आहे. “नेहरू नगर कुर्ला पूर्व येथील मातृदुग्धशाळेच्या जागेवर अत्याधुनिक सर्व सुविधायुक्त असं संकुल तसेच उर्वरित जागेवर वृक्षांचे संवर्धन व्हावे ह्या दृष्टीने बोटॅनिकल गार्डन उभारण्या दुग्ध विकास विभागाचा १० जून २०२४ शासन निर्णय रद्द करण्यात यावा”, अशी विनंती मंगेश कुडाळकर यांनी पत्राद्वारे केली आहे.
मंगेश कुडाळकर यांनी पत्रात नेमकं काय म्हटलंय?
“उपरोक्त विषयान्वये गेली अनेक वर्षे माझ्या विभानसभा क्षेत्रातील नेहरू नगर कुर्ता पूर्व येथील मातृदुग्धशाळेच्या जागेवर अत्याधुनिक सर्व सुविधायुक्त असे क्रीडा संकुल तसेच उर्वरित जागेवर वृक्षांचे संवर्धन होण्याकरिता मी सातत्याने पाठ पुरावा करीत आहे. संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने वारंवार मी स्थानिक नागरिकांच्या मागणीच्या अनुषंगाने पत्र व्यवहार करत आहे. तरीही दुग्ध विकास विभागाने 8.5 हेक्टर जमीन धारावी पुनर्वसन प्रकल्प झोपडपट्टी प्राधिकरणास हस्तांतरित करण्याबाबत शासन निर्णय झाला आहे”, असं मंगेश कुडाळकर म्हणाले.
सदरहू ठिकाणी असे क्रीडा संकुल तसेच उर्वरित जागेवर वृक्षांचे संवर्धन होणे ही स्थानिकांची मागणी आहे. स्थानिक नागरिकांच्या मागणीच्या अनुषंगाने दुग्ध विकास विभागाचा निर्णय तत्काळ रद्द करून नेहरू नगर कुर्ला पूर्व येथील मातृदुग्धशाळेच्या जागेवर अत्याधुनिक सर्व सुविधायुक्त असे क्रीडासंकुल, तसेच उर्वरित जागेवर वृक्षांचे संवर्धन व्हावे, या दृष्टीने बोटॅनिक गार्डन उभारावे”, अशी मागणी मंगेश कुडाळकर यांनी केली आहे.