सातारा(अजित जगताप) : वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असे संतांनी सांगून प्रबोधन केले होते. आज सातारा जिल्हा म्हणजे वृक्षतोड आम्हा सोयरे… धन दांडगे चरे.. असे झाले आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी जगभर जागतिक पर्यावरण दिन साजरा झाला पण साताऱ्यात वनविभागाच्या दुर्लक्षितपणाने पर्यावरण दीन साजरा झाल्याची टीका सामाजिक कार्यकर्ते महारुद्र तिकुंडे व माहिती अधिकार कार्यकर्ते कपिल राऊत
यांनी केली आहे.
नैसर्गिक वरदान लाभलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये दुष्काळी भागातही मोठ्या प्रमाणात वृक्षवल्ली आहे. त्यामुळे लोकांना नैसर्गिक आनंद व सावली मिळते. परंतु अलीकडच्या काळामध्ये विकासाच्या नावाने वृक्षाची कत्तल सुरू आहे. वनविभाग खऱ्या अर्थाने जागृती करण्यास अपयशी ठरले आहे. सामान्य ग्रामस्थ खेड्यापाड्यातून जन आंदोलन करत असताना वन विभाग मात्र निर्धास्त आहे. असे अनुभव घेतलेले ग्रामस्थ सांगत आहे.
पूर्वी सातारा जिल्हात वन विभागाच्या अधिकाऱ्याच्या कर्तव्यदक्षतेमुळे अनेक वृक्ष आजही दिमाखात उभे आहेत. अलीकडच्या काळात उलट हिरव्यागार वनराईतून आलेल्या अधिकारी बदली झाल्यानंतर उजाड माळरानावरून जात असल्याचा करिष्मा घडणार आहे. ही प्रशासनाची प्रगती का अधोगती? असा प्रश्न सामान्य माणसांना पडला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते श्री तिकुंडे व राऊत यांनी तर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना खास बाब म्हणून प्रतिनियुक्तीवर वखार महामंडळावर नियुक्ती करावी. अशी अफलातून मागणी केली आहे.
सातारा जिल्ह्यातील जावळी, महाबळेश्वर, पाटण, वाई, कास पठार व कराड सारख्या निसर्गरम्य ठिकाणी पूर्वी सुमारे तीन ते चार लाख जुनी झाडे रस्त्यालगत होती. आता ती दोन लाखावर आली असावी. असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड असूनही वन विभागाने कोणतीच कार्यवाही केलेली नाही. यामुळे वन विभागाचे क्षेत्र वाढवण्यास वन अधिकारी सातारा जिल्ह्यात नेमतात का झाडं तोडण्यासाठी? असा मार्मिक प्रश्न चुकून त्यांनी विचारला आहे.
माहितीच्या अधिकाराचा वापर करूनही वन अधिकारी कार्यालयात सापडत नाहीत. एवढा त्यांच्या पाठीशी कुणाचा वरद हस्त आहे. याचा शोध घेणे गरजेचे आहे. दरम्यान, या प्रश्नाबाबत आता तीव्र आंदोलन केले जाईल. असा इशारा श्री महारुद्र तिकुंडे व कपिल राऊत यांनी दिला आहे. दरम्यान, याबाबत संबंधित वन अधिकार्याची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. ते व्हिजिटला गेले असून तशा पद्धतीने हालचाल पुस्तिकेत नोंद आढळली नसल्याचीही माहिती काहींनी दिली आहे.
———-+—————————————–
फोटो — सातारा वन विभागाच्या कार्यालयात अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेलेले कार्यकर्ते…




