ताज्या बातम्या

खडकेवाडीच्या प्रथमेश कानगुडे यांची मुंबई पोलिस दलात निवड

करमाळा(अमोल पाटील) : करमाळा तालुक्यातील खडकेवाडी गावचे सुपुत्र प्रथमेश कानगुडे यांची मुंबई पोलिस दलात निवड झाल्याने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या यशामुळे खडकेवाडीसह संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
प्रथमेश कानगुडे यांनी जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. स्पर्धात्मक वातावरणात सातत्यपूर्ण अभ्यास, शारीरिक तयारी आणि आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी मुंबई पोलिस भरती प्रक्रियेत यश मिळवले. त्यांच्या निवडीमुळे गावातील युवकांना प्रेरणा मिळाली असून शासकीय सेवेत करिअर घडविण्याचा नवा आदर्श निर्माण झाला आहे.
प्रथमेश यांच्या यशामागे त्यांच्या आई-वडिलांचे मार्गदर्शन, कुटुंबीयांचे सहकार्य आणि शिक्षकांचे मोलाचे योगदान असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. त्यांच्या निवडीबद्दल खडकेवाडी ग्रामस्थ, मित्रपरिवार तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील सेवाकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
“प्रथमेश कानगुडे यांची मुंबई पोलिस दलात झालेली निवड ही खडकेवाडी गावासाठी अभिमानाची बाब असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा,” अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.

Scroll to Top