चांदवड (नाशिक) : आदिवासी धनगर समाज साहित्य संमेलन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रवीण काकडे यांना ‘महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा’ राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. काकडे हे अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट, कराडचे संस्थापक-अध्यक्ष तसेच ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रवीण काकडे हे शिक्षणाच्या प्रसारासाठी सातत्याने कार्यरत असून, गोरगरीब व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्या पुढाकारातून आतापर्यंत सुमारे ५ हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. तसेच दुर्गम डोंगर-दऱ्यातील भागातील महिलांसाठी साडी व सॅनिटरी पॅड वाटपाचे उपक्रम राबवून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यांतील दुर्गम भागात त्यांनी व्यापक सामाजिक कार्य उभे केले आहे. स्वतःची नोकरी सांभाळत त्यांनी ही समाजसेवेची वाट अविरत सुरू ठेवली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त काकडे यांनी राज्यातील कर्तृत्ववान महिलांचा भव्य सन्मान सोहळा आयोजित केला होता. कराड येथे १४५, पुण्यात ९० आणि मुंबईत १४२ महिलांचा सन्मान करण्यात आला. याचबरोबर कराड येथे एकाच वेळी २४५ विद्यार्थ्यांना ‘शिक्षणरत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
हा सन्मान सोहळा श्रीमंत अमरजीत राजे जाहीगरदार (तळोदा संस्थान, नंदुरबार), आमदार गोपीचंद पडळकर, खासदार रामराव वडकुते, आमदार राहुल आहेर, डॉ. प्रकाश महानवर (कुलगुरू), डॉ. अभिमन्यू टकले, बाळासाहेब कर्णवर पाटील यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी प्रवीण काकडे व प्रा. सौ. शितल काकडे यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.




