ताज्या बातम्या

स्वच्छ भारतासाठी संगम प्रतिष्ठानचे पाऊल पुढे; लोणावळ्यात जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

लोणावळा : स्वच्छ भारत अभियानात जनजागृती करण्यासाठी Sangam Pratishthan या संस्थेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत लोणावळा नगरपरिषद क्षेत्रात प्रभावी अभियान राबवले. Coca-Cola Beverages यांच्या सहकार्याने देशभर सुरू असलेल्या या उपक्रमाला स्थानिक पातळीवर चांगला प्रतिसाद मिळाला.
गेल्या १२ वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागासोबत “माझा कचरा माझी जबाबदारी” हा उपक्रम राबवणाऱ्या संगम प्रतिष्ठानने मागील सहा महिन्यांत कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशसह दक्षिण भारतात जनजागृती केली. त्यानंतर आता गोवा आणि महाराष्ट्रातही या मोहिमेचा विस्तार करण्यात आला आहे.
लोणावळा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी विविध सभापती, नगरसेवक तसेच माजी नगराध्यक्ष नारायण पालेकर यांनीही सहभाग नोंदवत अभियानाचे स्वागत केले. कोका-कोलाचे नॅशनल हेड तुषार पटनाईक यांनीही उपस्थित राहून उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमात निवृत्त अधिकारी तानाजी घाग यांनी स्वच्छतेसाठी लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित करत शाळा, महाविद्यालये आणि सोसायट्यांमध्ये अभियान राबवण्याचे आवाहन केले.
यावेळी “चकाचक लोणावळा” या पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. संगम प्रतिष्ठानचे स्वयंसेवक, पर्यावरणमित्र आणि कचरावेचकांच्या सहभागामुळे हा उपक्रम प्रभावी ठरला.

Scroll to Top