तळमावले/वार्ताहर : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने दिला जाणारा सन २०२४-२५ या वर्षाचा मानाचा ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ पत्रकार डॉ.संदीप राजाराम डाकवे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे सातारा जिल्ह्याच्या सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
हा गौरव सोहळा दि. २५ आणि दि. २६ मार्च, २०२६ रोजी मुंबईतील नरिमन पॉईंट येथील मंत्रालय समोर असलेल्या यशवंतराव चव्हाण सभागृहात अत्यंत दिमाखात संपन्न होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री ना.सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले, विधानसभा अध्यक्ष ना.ॲड.राहुल नार्वेकर, सामाजिक न्याय मंत्री ना.संजय शिरसाट, महिला व बालविकास मंत्री ना. माधुरी मिसाळ, खासदार अरविंद सावंत आणि मुंबईचे महापौर दत्तू तावडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
व्यसनमुक्ती चळवळीतील योगदानाची दखल
डॉ. संदीप डाकवे यांनी ‘पत्रकार’ प्रवर्गातून व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. या पुरस्काराचे स्वरूप १५,००० रुपये रोख, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे आहे.
डॉ.संदीप डाकवे यांना यापूर्वीही महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम ‘उत्कृष्ट पत्रकार’ पुरस्कार, राजमाता जिजाऊ स्वावलंबन सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मिळाले आहे. याव्यतिरिक्त त्यांना विविध सामाजिक संस्थांकडून आतापर्यंत सुमारे 90 हून अधिक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. संदीप डाकवे यांच्या या यशाबद्दल पाटण तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.




