मुंबई : मुंबई काँग्रेसने महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढून चांगले यश मिळवले आहे. सत्ताधारी भाजपा महायुतीने निवडणुकीत सरकारी यंत्रणा, पोलीस, निवडणूक आयोग यांच्या मदतीने गैरप्रकार केले, विरोधी पक्षांच्या उमेदवारांना धमकवण्य़ात आले, पैशांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला पण काँग्रेस कार्यकर्त्यांनी कशाचीही तमा न बाळगता लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी लढा दिला व काँग्रेसचा विचार सोडला नाही असे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केले.
मुंबई काँग्रेसच्या पॉलिटिकल अफेअर्स कमिटीची बैठक रमेश चेन्नीथला यांच्या प्रमख उपस्थितीत राजीव गांधी भवन येथे पार पडली. यावेळी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव यु. बी. व्यंकटेश, माजी मंत्री आ. अस्लम शेख, माजी मंत्री नसीम खान, खासदार चंद्रकांत हांडोरे, आमदार अमिन पटेल, आमदार भाई जगताप, आमदार ज्योती गायकवाड, मुख्य प्रवक्ते सचिन सावंत, माजी आमदार मधु चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले की, काँग्रेसने कार्यकर्त्यांच्या मागणीचा आदर व सन्मान करत महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढल्या व २४ नगरसेवक विजयी झाले, जे विजयी झाले त्यांचे अभिनंदन व जे लढले त्या सर्वांचेही अभिनंदन करतो. भाजपा सरकार विरोधी पक्षांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे. लोकशाही व संविधान धाब्यावर बसवून कामकाज केले जात आहे पण काँग्रेसचा कार्यकर्ता अशा हुकूमशाहीला घाबरत नाही. काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग मुंबईत आहे. यापुढे पक्ष संघटना वाढवण्यावर भर द्या, सर्व जिल्ह्यातील नियुक्त्या करा व मुंबईकरांचे प्रश्न हाती घेऊन सरकारला जाब विचारा, विविध आंदोलने, मोर्चे यांच्या माध्यमातून जनतेला न्याय देण्यासाठी लढा द्या, असे आवाहन रमेश चेन्नीथला यांनी केले आहे.




