
गोगवे(महाबळेश्वर) : सोळशी विभाग विकास सेवा सहकारी सोसायटी, गोगवे या संस्थेच्या वतीने सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रतिनिधीच्या ठरावासाठी घेण्यात आलेल्या सभेत सौ. शारदा संजय गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
गेल्या महिनाभर या निवडीसंदर्भात विविध राजकीय घडामोडी आणि चर्चांना वेग आला होता. अखेर बाबुरावदादा संकपाळ, संजुबाबा गायकवाड, अमितदादा कदम, अजित संकपाळ, संजय मोरे आणि गणेश उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच धोंडीबा धनावडे, डॉ. प्रमोद शेलार, संजय उतेकर, विशाल संकपाळ, महादेव शिंदे, सुरेश शिंदे, लक्ष्मण कदम, सचिन कदम आदींच्या प्रयत्नातून १०५ गाव समाज संघटनेच्या माध्यमातून सर्व सभासद आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने ही प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पाडली.
सोसायटीचे चेअरमन संतोष एकनाथ मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ठराव सभेत विरोधी गटाकडे आवश्यक संख्याबळ नसल्याने त्यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे सौ. शारदा गायकवाड यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.
यावेळी चेअरमन संतोष मोरे यांनी सांगितले की, “सेवा सोसायटी यापुढेही शेतकऱ्यांच्या गरजा आणि हित लक्षात घेऊन अधिक जोमाने कार्य करेल. विभागातील संस्थेत बाहेरील व्यक्तींनी स्थानिक लोकांना हाताशी धरून राजकारण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, १०५ गाव समाज संघटना आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे तो प्रयत्न निष्फळ ठरला.”
सभेत उपस्थितांनी पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन समाजहिताला प्राधान्य देत भविष्यातही सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.




