ताज्या बातम्या

‘दीपावली’ ठरला राज्यातील सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक; मुंबई मराठी पत्रकार संघाच्या प्रतिष्ठित स्पर्धेचा निकाल जाहीर

मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघ आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २५ व्या राज्यस्तरीय आणि रायगड जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धा २०२५ चा निकाल जाहीर करण्यात आला. यंदाच्या स्पर्धेत ‘दीपावली’ या दिवाळी अंकाने सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकाचा मान पटकावत एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानाचा पुरस्कार मिळविला.
श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी मंगळवारी या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचा निकाल जाहीर केला. राज्यस्तरीय स्पर्धेत ‘मुक्त संवाद’ द्वितीय, तर ‘वसा’ आणि ‘अक्षरलिपी’ यांनी संयुक्तपणे तृतीय क्रमांक पटकावला. ‘नवभारत’ या अंकाची सर्वोत्कृष्ट विशेषांक म्हणून निवड करण्यात आली असून ‘बाईमाणूस’ या अंकाला लक्षवेधी उत्कृष्ट अंकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेत ‘इंद्रधनु’ प्रथम, ‘आगरी दर्पण’ द्वितीय आणि ‘शब्द संवाद’ तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी महत्त्वाची घोषणा करत २०२६ पासून डिजिटल दिवाळी अंकांसाठीही प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे स्वतंत्र पुरस्कार दिले जाणार असल्याचे सांगितले. बदलत्या माध्यमांचा स्वीकार करत डिजिटल साहित्यालाही प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मराठी साहित्यविश्वातील वैभवशाली परंपरा असलेल्या दिवाळी अंकांना शासनाचे अनुदान मिळावे, यासाठीही आपण पुढाकार घेणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. यासंदर्भात मुंबई मराठी पत्रकार संघाने दिवाळी अंकांच्या संपादकांची बैठक आयोजित करावी आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सांस्कृतिक मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले.
यंदाच्या स्पर्धेसाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर प्रवेशिका प्राप्त झाल्या. प्रा. वीणा सानेकर, रेखा देशपांडे आणि सुलेखनकार सुनील धोपावकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धेचे मुख्य समन्वयक म्हणून शैलेंद्र शिर्के, तर रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेचे समन्वयक म्हणून दीपक म्हात्रे यांनी जबाबदारी सांभाळली. पुरस्कार वितरण सोहळा लवकरच पत्रकार भवन, मुंबई येथे खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे.
राज्यस्तरीय प्रमुख पुरस्कार
सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक : दीपावली, द्वितीय : मुक्त संवाद, तृतीय : वसा / अक्षरलिपी (संयुक्त), सर्वोत्कृष्ट, विशेषांक : नवभारत, लक्षवेधी उत्कृष्ट अंक : बाईमाणूस
मुलांसाठी सर्वोत्कृष्ट अंक : मुलांचे मासिक, रायगड जिल्हास्तरीय प्रमुख पुरस्कार
प्रथम : इंद्रधनु, द्वितीय : आगरी दर्पण, तृतीय : शब्द संवाद,

मुंबई मराठी पत्रकार संघाने सर्व पुरस्कार विजेते, सहभागी संपादक, प्रकाशक आणि साहित्यप्रेमींचे अभिनंदन करत स्पर्धेला लाभलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त केले.

Scroll to Top