मुंबई : श्री. काळेश्वरी मित्र मंडळ (मुंबई) सावरी व श्री. काळेश्वरी महिला मंडळ (मुंबई) सावरी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री. रांजणदेवी मंदिर हॉल, कोपरखैरणे (सेक्टर १९ अ, नवी मुंबई) येथे सावरी गावातील सासरवाशिणी व माहेरवाशिणींसाठी हळदी-कुंकू समारंभ तसेच ‘होम मिनिस्टर’ या करमणुकीच्या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. तसेच सावरी गावची ग्रामदेवता श्री काळेश्वरी देवीचे स्मरण, पान-विडा व नारळ अर्पण करून आणि श्री गणेशाच्या प्रतिमेस हार अर्पण करून विधीवत पूजन करण्यात आले. पूजन श्री. काळेश्वरी मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री. अंकुश गोविंद शिंदे व कार्यकारिणी सदस्य तसेच श्री. अशोक गणपत शिंदे, श्री. दत्तात्रय महादेव शिंदे, श्री. सुभाष धोंडीबा शिंदे आणि श्री. जगन्नाथ किसन सकपाळ यांच्या हस्ते संपन्न झाले.
दीपप्रज्वलन सावरी गावाच्या परंपरेनुसार पाच सुवासिनी – सौ. रेशमा संपत शिंदे, सौ. सुषमा जगन्नाथ शिंदे, सौ. विमल एकनाथ शिंदे, सौ. विमल कावरनाथ शिंदे व सौ. नेहा निवृत्ती शिंदे – यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत गीत कु. ऋतुजा प्रकाश शिंदे, कु. स्वरा प्रकाश शिंदे आणि कु. लावण्या श्रीरंग शिंदे यांनी सादर करून उपस्थितांचे मन जिंकले.
या प्रसंगी गावातील कन्या कु. हर्षीला आनंद शिंदे (CA), कु. राधिका अशोक शिंदे तसेच सासरवाशिणी सौ. मिनाक्षी आनंद शिंदे, सौ. सावित्री दत्तात्रय शिंदे, सौ. सुलभा महेंद्र शिंदे, सौ. रुपाली महेंद्र शिंदे, सौ. सुषमा आनंद शिंदे, सौ. शिल्पा रघुनाथ सकपाळ आणि माहेरवाशिणी सौ. छाया संतोष कदम, सौ. निकिता साळुंखे, सौ. सिमा मोरे तसेच श्री. अनिल सखाराम शिंदे यांनी मनोगत व्यक्त करून मंडळाच्या कार्याचे कौतुक केले.
‘होम मिनिस्टर’ या खेळात सासरवाशिणी व माहेरवाशिणींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. या कार्यक्रमाचे संचालन खांबील-चोरगे येथील कलाकार श्री. राजेश सुरेश कदम यांनी अतिशय रंगतदार पद्धतीने केले. विजेत्यांसाठी तब्बल ३८ बक्षिसे ठेवण्यात आली होती.
मानाच्या पैठणीसाठी अंतिम फेरीत सौ. शिल्पा रघुनाथ सकपाळ, सौ. प्रियांका योगेश कांबळे व सौ. स्मिता सिताराम शिंदे या स्पर्धकांनी धाग्याचे रिळ हाताने रिकामे करण्याच्या चुरशीच्या फेरीत सहभाग घेतला. यामध्ये प्रथम क्रमांक पटकावत सौ. शिल्पा रघुनाथ सकपाळ या मानाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या. द्वितीय क्रमांक सौ. प्रियांका योगेश कांबळे तर तृतीय क्रमांक सौ. स्मिता सिताराम शिंदे यांनी मिळवला.
कार्यक्रमासाठी श्री. भानुदास निकम (अध्यक्ष – आधार फाऊंडेशन, रोहोट) यांनी होम मिनिस्टरसाठी भेटवस्तू दिल्या. तसेच हळदी-कुंकू कार्यक्रमासाठी वाणाच्या भेटवस्तू श्रीमती नंदाताई सुरेश जाधव व सौ. मृणालताई विकास जाधव (धावली) यांनी दिल्या. चहा-नाश्ता, भोजन व्यवस्था तसेच प्रथम (पैठणी), द्वितीय (साडी) व तृतीय (भेटवस्तू) बक्षिसांची संपूर्ण व्यवस्था मित्र मंडळामार्फत करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशासाठी मित्र मंडळ व महिला मंडळाच्या सर्व कार्यकारिणी सदस्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. महिला मंडळाने आर्थिक निधी उभारून नारीशक्तीची एकजूट दाखवून आदर्श निर्माण केला.
सूत्रसंचालन श्री. आनंद शिंदे (आण्णाबुवा) यांनी केले. मंडळाची प्रस्तावना सचिव श्री. अमोल (सिताराम) महादेव शिंदे यांनी मांडली. प्रमुख उपस्थितीमध्ये श्री. भानुदास निकम, जेष्ठ सल्लागार श्री. कृष्णा गेनु शिंदे, श्रीमती नंदाताई जाधव, सौ. मृणालताई जाधव व कलाकार श्री. राजेश कदम यांचा समावेश होता.
मान्यवरांनी सावरी गावाच्या एकीचे व महिला मंडळाच्या ड्रेसकोडचे विशेष कौतुक केले. पुढील काळातही असेच उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. शेवटी सचिव श्री. अमोल शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.
खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेला हा सोहळा सावरीकरांसाठी अविस्मरणीय ठरला.




