ताज्या बातम्या

स्वच्छ भारत अभियान केवळ कागदावर? कराड तालुक्यातील कार्वे नाका परिसरात रस्त्यावर कचऱ्याचे ढीग, शाळकरी मुलांच्या जीवाला धोका….

कराड(प्रताप भणगे) : कराड तालुक्यातील कार्वे नाका परिसरात, मंगल कार्यालयासमोर गोळेश्वर रोड हद्दीत स्वच्छ भारत अभियानाची अक्षरशः थट्टा होत असल्याचे चित्र समोर आले आहे. लाखो रुपये खर्च करून राबवण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छतेच्या घोषणा दिल्या जात असताना, प्रत्यक्षात मात्र या ठिकाणी रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे.
या कचऱ्याच्या ढिगांमुळे परिसरात गाढवे, डुक्कर, कुत्रे तसेच इतर भटक्या प्राण्यांचा वावर वाढला आहे. हे प्राणी येथे येऊन कचऱ्यावर ताव मारताना दिसत असून, त्यामुळे संपूर्ण परिसर अस्वच्छ व आरोग्यास घातक बनला आहे. विशेष म्हणजे याच रस्त्यावरून शाळेची लहान मुले दररोज ये-जा करत असतात. कचऱ्यामुळे जमा होणारे पिसाळलेले कुत्रे व इतर प्राणी यांच्यापासून शाळकरी मुलांना मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी वारंवार कचरा टाकला जातो, मात्र संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही. कचरा उचलण्याऐवजी अनेकदा साचलेल्या कचऱ्याला आग लावली जाते, त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरते. या धुरामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून, श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ व इतर समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
“प्रशासन नेमके कुठे आहे?” असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. निवडणुकांच्या काळात स्वच्छता, विकास आणि नागरिकांच्या आरोग्याच्या नावाने गाजावाजा केला जातो, मात्र निवडणुका संपल्यानंतर सर्वसामान्यांच्या व्यथा दुर्लक्षित केल्या जातात, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.
या गंभीर समस्येकडे नगरपालिका व संबंधित स्वच्छता विभागाने तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे. कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई, नियमित कचरा उचल, त्या ठिकाणी सूचना फलक व सीसीटीव्ही बसवणे, तसेच परिसराची निर्जंतुकीकरण मोहीम राबवणे, अशा ठोस उपाययोजना त्वरित करण्यात याव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
जर वेळीच कारवाई झाली नाही, तर एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासन जागे होणार की पुन्हा एखाद्या घटनेनंतरच हालचाल करणार, असा प्रश्न आता कराडकर विचारत आहेत.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top