मुंबई : ओबीसी आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर कुणबी आता झुकणार नाही, थांबणार नाही या घोषणा
देत, उद्या गुरुवारी ९ ऑक्टोबरला आझाद मैदानात धडकणार आहेत. कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष अनिल नवगणे यांच्या नेतृत्वात सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरुवात होणार असून राज्यभरातून समाजबांधव मोठ्या संख्येने यात सहभागी होणार आहेत.
जारंगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने सुधारित परिपत्रक काढून कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयाचा तीव्र निषेध करत कुणबी समाजाने मोर्चाची हाक दिली आहे. हा लढा कुणबी समाजाच्या अस्तित्वाचा असून शासनाने घेतलेल्या निर्णयांविरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी ही एकजूट दाखवली जाणार आहे. तसेच राज्यातील कुणबी समाजाला स्वतंत्र ओबीसी आरक्षण मिळावे, प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया सुलभ व्हावी आणि शासनाने घेतलेले ताजे निर्णय मागे घ्यावेत, या मुख्य मागण्यांवर हा एल्गार केंद्रित करण्यात आला आहे. या आंदोलनाला कोकणातील सात जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कुणबी संघटनांचा मोठा प्रतिसाद मिळत असून आझाद मैदानावर कुणबी समाजाचा एल्गार उसळण्याची चिन्हे आहेत.
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईचा दौरा असून दुसरीकडे आपल्या हक्काच्या मागण्यासाठी कुणबी बांधव मोठ्या संख्येने आझाद मैदानात दाखल होणार आहेत. नमन, भारुड, शक्ती- तुरा आदी विविध कला सादर केल्या जाणार आहेत. आझाद मैदान पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत कुणब्यांची ताकद दाखवून देणार असा इशारा अध्यक्ष नवगणे यांनी दिला आहे. तसेच आजवरचा कुणबी समाजाचा हा पहिलाच मोर्चा असल्याने प्रशासन सतर्क असून पोलीस विभागाकडून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. आझाद मैदान परिसरात वाहतूक नियंत्रणासाठी स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली आहेत. तर कुणबी समाजोन्नती संघाच्यावतीने शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे.