ताज्या बातम्या

नवी मुंबईच्या राजकारणात खळबळ – भाजपा नगरसेवक मुख्यमंत्र्याकडे  शिंदे विरोधात करणार तक्रार

नवी मुंबई : नवी मुंबईच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात भाजपमध्ये नाराजीचा सूर चांगलाच वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते व मंत्री गणेश नाईक यांनी नुकतीच भाजपच्या माजी नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत शिंदे यांच्याविरोधात ठाम भूमिका घेण्यात आली असून आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढावी असा ठराव माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी मांडला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे माजी नगरसेवक संजय नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिंदेंविरोधात मोर्चा काढण्याचीही तयारी सुरू आहे. एवढेच नाही, तर या माजी नगरसेवकांचा प्रतिनिधीमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिंदेंची तक्रार करणार असून येत्या काही दिवसांत ही तक्रार वर्षा बंगल्यावर दाखल होणार आहे. शिंदे हे नगरविकास खात्याचे मंत्री असल्याने माजी नगरसेवकांच्या विकासकामांना जाणूनबुजून अडथळा आणत असल्याचा गंभीर आरोप या तक्रारीत करण्यात येणार आहे.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शिंदे उपस्थित असताना गणेश नाईक गैरहजर राहिल्याने आधीच चर्चांना उधाण आले होते. त्यातच काही दिवसांपूर्वी नाईक यांनी ठाण्यात आयोजित बैठकीत “रावणाचा अहंकार दहन केला पाहिजे” असे विधान करून शिंदेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता.
सध्या गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबाराचे आयोजन सुरू केले आहे. या सर्व घडामोडींमुळे नवी मुंबईचे राजकारण चांगलेच तापले असून ‘नाईक विरुद्ध शिंदे’ असा संघर्ष अधिक ठळकपणे पुढे येताना दिसत आहे.
📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top