मुंबई : आशिया खंडातील पहिल्या महिला लोकोमोटीव पायलट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेखा शंकर यादव (लग्नपूर्व नाव सुरेखा रामचंद्र भोसले) या 30 सप्टेंबर 2025 रोजी रेल्वे सेवेतून निवृत्त होत आहेत. तब्बल 36 वर्षांच्या सेवेनंतर रेल्वे इतिहासात त्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे.
सातारा जिल्ह्यातील 2 सप्टेंबर 1965 रोजी जन्मलेल्या सुरेखा यांचे शिक्षण सेंट पॉल्स कॉन्व्हेंट हायस्कूल (सातारा) व गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, कराड येथे झाले. सुरुवातीला B.Sc. व B.Ed. करण्याची इच्छा असतानाच त्यांना रेल्वेत संधी मिळाली आणि त्या वेगळ्याच मार्गावर निघाल्या.
1987 मध्ये त्यांनी रेल्वे भरती मंडळामार्फत प्रवेश घेतला. कल्याण प्रशिक्षण शाळेत सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून 1989 मध्ये “असिस्टंट लोको ड्रायव्हर” म्हणून सुरुवात झाली. प्रथम मालगाड्या, नंतर उपनगरी गाड्या आणि मग मेल-एक्सप्रेस अशा टप्प्यांवर त्यांनी कारकीर्द घडवली.
8 मार्च 2011 रोजी आंतरराष्ट्रीय महिला आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांचा गौरवशाली प्रवास आता निवृत्तीच्या उंबरठ्यावरदिनानिमित्त त्यांनी ‘डेक्कन क्वीन’ चालवून आशियातील पहिल्या महिला पायलटचा मान मिळवला.
मार्च 2023 मध्ये त्यांनी ‘वंदे भारत एक्सप्रेस’ (सोलापूर–CSMT) चालवून आणखी एक इतिहास घडवला. निवृत्तीपूर्वी 18 सप्टेंबर 2025 रोजी त्यांनी ‘राजधानी एक्सप्रेस’ चालवून रेल्वे प्रवासाला संस्मरणीय निरोप दिला. त्यांना जिजाऊ पुरस्कार (1998), महिला साधक पुरस्कार (2001), सह्याद्री हिरकणी (2004), प्रेरणा पुरस्कार (2005), सेंट्रल रेल्वे वूमन अचिव्हर अवॉर्ड (2011) यांसारखे अनेक सन्मान मिळाले आहेत.
महिला रेल्वे इंजिन चालवू शकतात का, या प्रश्नचिन्हासमोर सुरेखा यांनी चिकाटी, आत्मविश्वास आणि कुटुंबाच्या पाठिंब्याच्या जोरावर यश मिळवले. “केवळ ताकद नाही तर हृदय, धाडस आणि चिकाटी हे गुण महत्त्वाचे आहेत,” असा संदेश त्यांनी निवृत्तीच्या उंबरठ्यावर दिला आहे.