Sunday, September 7, 2025
घरमहाराष्ट्रगणपती बाप्पांना मुख्यमंत्र्यांचा जल्लोषात निरोप

गणपती बाप्पांना मुख्यमंत्र्यांचा जल्लोषात निरोप

मुंबई(रमेश औताडे) : महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे, त्या उत्सवाचा जल्लोष आज गिरगाव चौपाटीवर उच्चांक गाठताना दिसला. या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः उपस्थित राहून गणरायाला निरोप दिला.

राज्य महोत्सवाच्या या उत्साहात गीरगाव चौपाटीवर विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्यमंत्री योगेश कदम, आमदार अमित साटम, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अमितकुमार सैनी तसेच हजारो भाविक यांची उपस्थिती होती. ढोल-ताशांच्या गजरात आणि “गणपती बाप्पा मोरया”च्या गजरात वातावरण भारावून गेले होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सभापती प्रा.राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी गणेश मूर्तींवर पुष्पवृष्टी करून गणरायांना निरोप दिला.

राज्यात दहा दिवसांचा गणेशोत्सव उत्साहात आणि शांततेत पार पडल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. “लोकांनी हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला. बाप्पाच्या विसर्जनावेळी मनात थोडीशी खंत व दु:ख होते, कारण दहा दिवसांनी बाप्पा आपल्याला सोडून जातात. पण याचबरोबर पुढच्या वर्षी ते परत येणार आहेत याचा आनंदही असतो,” असे श्री.फडणवीस म्हणाले.

मुंबई, पुणे तसेच राज्यातील सर्व शहरांमध्ये, गावांमध्ये गणेशोत्सवाच्या मिरवणुका शांततेत व शिस्तीत पार पडल्या. “पोलीस विभाग, महानगरपालिका आणि स्थानिक प्रशासन यांनी केलेल्या व्यवस्थेमुळे हा उत्सव सुरळीत पार पडला. त्यांचे काम कौतुकास्पद आहे,” असेही फडणवीस यांनी सांगितले.

गिरगाव चौपाटीवरील विसर्जन सोहळ्याला मुंबईकरांसोबत विविध मान्यवरांचीही उपस्थिती होती. मुंबई महानगरपालिका, पोलिस व स्वयंसेवकांच्या मदतीने विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments