Thursday, August 28, 2025
घरमहाराष्ट्रचोरांबेकरांनी दाखवून दिले... मेरा गाव... मेरा एक गणपती....

चोरांबेकरांनी दाखवून दिले… मेरा गाव… मेरा एक गणपती….

सातारा(अजित जगताप) : विद्येची देवता असे वर्णन केलेल्या श्री गणरायाच्या आगमनाने सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचे म्हणजे जावळी तालुक्यातील चोरंबे गावकऱ्यांनी एक गाव एक गणपती ही परंपरा कायम राखली आहे. त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे.

जावली तालुक्यातील चोरांबे ग्रामपंचायतने यंदाही गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पर्यावरणपूरक आणि एकात्मतेचा आदर्श घालून दिला आहे. मेढा व महाबळेश्वर रस्त्यावरील जावळी तालुक्यातील निसर्गरम्य परिसरामध्ये चोरंबे संपूर्ण गावात केवळ एकच सार्वजनिक गणपती बसवला गेला आहे. विशेष म्हणजे, चोरांबे गावात ही परंपरा पूर्वीपासूनच सुरू असून कोणत्याही कुटुंबाच्या घरी स्वतंत्र गणपती बसवला जात नाही. गावकरी एकत्र येऊन हाच सार्वजनिक गणपतीची पूजा-अर्चा करतात. अशी माहिती जावलीचे गटविकास अधिकारी डॉ निलेश पाटील यांनी दिली.

गावाचे युवा सरपंच श्री. विजय सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली चोरंबे ग्रामस्थांनी उत्सवाच्या माध्यमातून खर्चात बचत केली आहे. शिवसेनेचे जावळी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सदाशिव सकपाळ यांचे हे गाव आहे. या गावचा विकास झपाट्याने होत आहे. तसेच गावातील गावगाडा सुद्धा एकमेकांच्या प्रगतीमध्ये हातभार लावत आहे.
सामाजिक जाणीव ठेवल्यामुळे या गावात
प्रदूषण नियंत्रण आणि सामाजिक एकोपा साधण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे.

श्री गणरायाच्या मोठ्या मूर्ती, ध्वनीप्रदूषण किंवा प्रदूषणकारी साहित्य टाळून स्वच्छता, साधेपणा आणि सामूहिक सहभाग यावर गावातील एकमेव अशा सार्वजनिक गणेशोत्सवाला भर देण्यात आला आहे.

चोरांबे ग्रामपंचायतीला यापूर्वीच संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये जिल्हास्तरीय पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे स्वच्छतेबाबतची जाणीव, ग्रामविकासासाठीची बांधिलकी आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्याची परंपरा या गावाने जपली आहे.

आजच्या काळात अनेक ठिकाणी गणेशोत्सवाच्या नावाखाली होणारा डीजे व डॉल्बीचा दणदणाट लोकांना अस्वस्थ करत आहे. गणेशोत्सवानिमित्त राजकीय नेत्याची मर्जी राखण्यासाठी अवाजवी खर्च, प्रदूषण आणि समाजातील फूट पाहायला मिळते. मात्र, चोरांबे गावाने दाखवून दिले आहे की, “एकत्र येऊन सामूहिक पद्धतीने उत्सव साजरा केल्यास तो अधिक भव्य, पर्यावरणपूरक आणि अर्थपूर्ण होतो. याचा अनुभव ग्रामस्थ घेत आहेत. जावळी तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदाय अखंड झरा वाहत आहे. त्यामध्ये व्यसनमुक्तीचे तेल टाकल्यास खऱ्या अर्थाने परिवर्तनाची ज्योत तेवत राहील.अशी अपेक्षा काही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

___________________
फोटो– एक गाव एक गणपतीचे दर्शन घडवताना चोरंबे येथील गणरायाची मूर्ती (छाया– निनाद जगताप सातारा)

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments