प्रतिनिधी : शिक्षण व आरोग्य हे जनतेचे मुलभूत अधिकार आहेत परंतु भारतीय जनता पक्ष गोरगरिब जनतेच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू पहात आहे. मुंबई महानगर पालिकेने सर्वसामान्य समाजातील मुलांना चांगले व दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून १०० कोटी रुपये खर्च केले आहेत.भाजपा सरकार मात्र स्वयंसेवी संस्थांच्या नावाखाली या शाळा खाजगी लोकांच्या हाती देत आहे. याला पालकांचा व काँग्रेसचा तीव्र विरोध असून भाजपा सरकारचा हा कुटील डाव आम्ही हाणून पाडू, असा इशारा मुंबई काँग्रेस अध्यक्षा, खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.मुंबई महानगरपालिकेच्या मालवणी टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाच्या विरोधात मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, माजी मंत्री आमदार अस्लम शेख यांनी पालक आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत तीव्र आंदोलन करून भाजपा सरकारला जाब विचारला. यावेळी पालकमंत्री मंगल प्रभात लोढांना भेटण्याचा काँग्रेस शिष्टमंडळाने प्रयत्न केला पण पोलिसांनी भेटू दिले नाही म्हणून संतप्त शिष्टमंडळाने पालकमंत्री मंगलप्रभात लोढा व भाजपा सरकारला बांगड्यांचा आहेर दिला. या आंदोलनात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड, आमदार अस्लम शेख, मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, माजी नगरसेवक वीरेंद्र चौधरी, कमरजहा सिद्दिकी, राजपती यादव, बब्बू खान, अवनीश सिंग यांच्यासह काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, गेल्या दशकांहून अधिक काळ अस्तित्वात असलेल्या मालवणी टाऊनशीप शाळेचे मनमानी खासगीकरण करण्याचे पाप केले जात आहे. हे अतिशय धक्कादायक आणि संतापजनक आहे. भाजप सरकारच्या या गरीबविरोधी कृतीचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत आहे. डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने मुलांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा (आरटीई) आणला. परंतु भ्रष्ट भाजपा सरकार हा मूलभूत अधिकार देखील गोरगरिबांकडून हिरावून घेत आहे. महानगरपालिकेच्या शाळा चालू ठेवणे हे राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेचे मुख्य उद्दिष्ट असायला हवे. पण हे सरकार आपल्या बिल्डर मित्रांसाठी मनपाच्या शाळा बंद करून खासगी लोकांच्या घशात घालत आहे असे खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.
गरिबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे भाजपा सरकारचे षडयंत्र – खा. वर्षा गायकवाड.
RELATED ARTICLES