महाबळेश्वर (नितीन गायकवाड) : महाबळेश्वर तालुक्यातील वाडा कुंभरोशी ते तापोळा या पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी शासनाकडे कमी खर्चाचा कोल्हापूर पद्धतीचा स्वनियंत्रित बंधारा बांधून देण्याची मागणी केली आहे. झांजवड, दुधगाव, चतुरबेट, गोरोशी व घोणसपूर या गावांसाठी हा बंधारा अत्यावश्यक असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
चतुरबेट येथे यापूर्वी बांधलेला बंधारा पावसाच्या तडाख्यामुळे वाहून गेला. मात्र शासनामार्फत अद्याप त्याची पुनर्बांधणी झालेली नाही. त्यामुळे स्थानिकांनी अनेक वेळा शासनाकडे तसेच माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्री यांच्याकडे विनंती करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.
“महाबळेश्वर हे जागतिक पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते, मात्र स्थानिक शेतकऱ्यांसाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. दवाखाने नाहीत, रस्ते नाहीत, पाण्यासाठी वणवण करावी लागते. पर्यटनाच्या सुविधा केल्या जातात मग स्थानिक शेतकऱ्यांच्या जिवनावश्यक गरजांकडे शासनाने का दुर्लक्ष करावे?” असा सवाल अनंत शंकर जाधव यांनी उपस्थित केला.
कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची रचना सोपी, खर्चिकदृष्ट्या परवडणारी आणि उपयुक्त असल्याने राज्यातील अनेक ठिकाणी यशस्वीपणे बांधण्यात आली आहे. त्याच धर्तीवर चतुरबेट दुधगाव सोसायटी परिसरात बंधारा बांधला गेला, तर शेतीसाठी पाणी उपलब्ध होईलच, शिवाय पिण्याच्या पाण्यासाठी व ग्रामीण पर्यटनालाही चालना मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
ग्रामस्थांनी शासनाला तातडीने लक्ष घालून कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधून द्यावा, तसेच आरोग्यसेवा व दळणवळण सुविधा पुरवाव्यात, ही मागणी केली आहे.