मुंबई :-मुंबई जोगेश्वरीतील कोकणनगर गोविंदा पथकाने दहीहंडीचे १० थर रचून विश्वविक्रम रचला आहे. ठाण्यातील प्रताप सरनाईक यांच्या संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीत कोकण नगर गोविंदा पथकाने १० थर रचले. कोकण नगर गोविंदा पथकाने जय जवान पथकाचा विक्रम मोडीत काढला आहे.
जय जवान गोविंदा पथकाने २०१२ मध्ये ठाण्यात प्रथमच नऊ थर रचून विक्रम केला होता. त्यानंतर या पथकाने त्याचवर्षी ऑक्टोबरमध्ये स्पेनमधील पथकाच्या विक्रमाची बरोबरी केली होती. त्यानंतर या पथकाने साडे नऊ थर रचून आपलाच विक्रम मोडीत काढला. यंदा हे गाेविंदा पथक आपला विक्रम पुन्हा मोडीत काढण्याच्या तयारीत होते मात्र त्याआधीच जोगेश्वरीतील कोकणनगर गोविंदा पथकानं १० थर लावत विश्व विक्रम केला आहे.
कोकणनगर गोविंदा पथकाने वर्तकनगर येथील मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित दहीहंडी उत्सवात दहा थर लावून विश्वविक्रम केला. या विक्रमानंतर मंत्री सरनाईक यांनी मंडळाला २५ लाखांचे पारितोषिक जाहीर करताच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जयघोष सुरू केला. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे वर्तकनगर येथील मैदानात दहीहंडी उत्सव उत्साहात, जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. या मंडळांकडून दरवर्षीप्रमाणे लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.