नवी मुंबई (ओमकार धुळप) : नवी मुंबईतील गणेशोत्सव स्पर्धेत कोपरखैरणे येथील *‘बाप्पा फुलांचा इच्छापूर्ती मंडळा’*ने यंदा आपली छाप पाडत प्रथम पारितोषिक पटकावले. नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे दरवर्षी गणेशोत्सव मंडळांच्या विविध उपक्रमांचे, सजावटीचे तसेच सामाजिक कार्याचे मूल्यमापन करून पारितोषिके प्रदान केली जातात.
पुरस्कार स्वीकारताना मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेश पालवे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या उत्साहात उपस्थित होते. या पारितोषिकामुळे मंडळातील कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला असून, त्यांच्या मेहनतीला योग्य असा मान मिळाल्याची भावना मंडळाने व्यक्त केली.
मंडळाच्या वतीने अध्यक्ष पालवे यांनी सांगितले की, “हा सन्मान आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या सामूहिक परिश्रमांचा आणि भक्तिभावाचा गौरव आहे. पुढील काळातही आम्ही गणेशोत्सव साजरा करण्याबरोबरच सामाजिक कार्यात अधिक सक्रिय राहू.”
गणेशोत्सवाच्या निमित्ताने *‘बाप्पा फुलांचा इच्छापूर्ती मंडळा’*ने सजावटीसोबतच विविध सामाजिक उपक्रम राबवले होते. त्यामध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव, रक्तदान शिबिर, तसेच समाजजागृतीसाठी घेतलेल्या उपक्रमांना विशेष दाद मिळाली.
या विजयामुळे कोपरखैरणे परिसरात उत्सवी वातावरण अधिकच रंगतदार झाले असून, मंडळाचे नाव नवी मुंबईत मानाच्या स्थानी पोहोचले आहे.
कोपरखैरणेचा ‘बाप्पा फुलांचा इच्छापूर्ती मंडळा’ नवी मुंबई महानगरपालिकेकडून प्रथम पारितोषिकाने सन्मानित
RELATED ARTICLES