प्रतिनिधी : मागील तीन-चार पिढ्यांपासून बीडीडी चाळीत राहणाऱ्या हजारो कुटुंबांच्या हक्काच्या घराचे स्वप्न आता वास्तवात उतरत आहे. केवळ घर नव्हे, तर उत्तम दर्जा, आधुनिक सुविधा आणि दीर्घकालीन टिकाऊपणा हे या पुनर्विकासाचे वैशिष्ट्य ठरत आहे. हा प्रकल्प पुनर्विकासाचा नवा आदर्श आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, बांधकामातील ‘ सेलेबल कंपोनंट‘ सारखीच उच्च गुणवत्ता थेट रहिवाशांच्या घरांसाठी ठेवण्यात आली आहे. या इमारती पुढील १०० वर्षे टिकाव्यात, १२ वर्षे मेंटेनन्स मुक्त राहाव्यात यासाठी उत्कृष्ट साहित्य व तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. जागेचा पुरेपूर वापर, सुयोग्य आराखडे आणि रहिवाशांच्या गरजा लक्षात घेत बांधकाम करण्यात आले आहे. ब्रिटिश काळात कामगारांसाठी बांधलेल्या बीडीडी चाळीमध्ये देशभरातील विविध भागांतून आलेल्या लोकांनी आयुष्य घालवले. या परिसराने कामगार चळवळी, सामाजिक आंदोलनं, सांस्कृतिक घडामोडी अनुभवलेल्या आहेत. आज त्या ठिकाणीच, आधुनिक इमारती, मोकळी जागा, गार्डन, मैदान, क्लब हाऊससारख्या सुविधा देऊन एक ‘वॉक टू वर्क’ संकल्पना प्रत्यक्षात आणली जात आहे. या सदनिकांचे मालकी हक्क महिलांच्या नावे असावे, यासाठी काही तरतूद करावी, अशा सूचनाही यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
राज्य शासनाने मेट्रो नेटवर्क, अटल सेतूसारखे महामार्ग प्रकल्प, खड्डेमुक्त रस्ते आणि शहर सुशोभीकरणाच्या कामांना गती दिली आहे. यामुळे वाहतूक कोंडी कमी होणार असून मुंबई-एमएमआरचा विकास वेगाने होईल. गृहनिर्माण धोरणानुसार गिरणी कामगार, झोपडपट्टी रहिवासी, विद्यार्थी, नोकरदार महिला सर्व घटकांचा समावेश करण्यात आला आहे. गृहनिर्माणाच्या क्लस्टर विकासामुळे मोकळी जागा, खेळाची मैदाने, सोसायटी सुविधा उपलब्ध होत आहेत. धारावी पुनर्विकास हा गृहनिर्माण पुनर्विकासातील सर्वात मोठा टप्पा ठरणार आहे, जो जगभरातून पाहायला लोक येतील.